पुणे : पुण्यातील माईर्स एमआयटीच्या विश्वशांती गुरुकुल शाळेने विद्यार्थी आणि पालकांवर लादलेल्या वादग्रस्त अटी आणि नियम अखेर मागे घेतले आहेत. पालकांनी अटींविरोधात आवाज उठवल्यानंतर, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे महापालिकेची शिक्षण समिती तसंच राज्याच्या शिक्षण उपसंचालिकांची टीम चौकशी शाळेत दाखल झाली होती. यानंतर झालेल्या चर्चेनंतर शाळेने घातलेल्या अटी आणि नियम मागे घेतल्याचं जाहीर केलं.

शाळा प्रशासनाने यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. "शाळा प्रशासनाने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या गणवेशासंदर्भात डायरीमध्ये दिलेल्या सूचना या कोणाच्याही वैयक्तिक अथवा सामूहिक भावना दुखावण्याचा हेतू शाळा प्रशासनाचा नव्हता आणि नाही. याबाबत शाळेच्या प्रशासनाकडून सदैव विद्यार्थी केंद्रीत विचार करुन संबंधित डायरी आणि सूचना मागे घेण्यात येत आहे," असं या निवेदनात म्हटलं आहे.



शाळेतील विद्यार्थिनींनी पांढऱ्या आणि स्किन रंगाची अंतवस्त्रे घालावी, स्कर्टची लांबी ठराविक हवी, पालकांनी एकमेकांशी बोलू नये, विद्यार्थ्यांनी केस एकदम लहान ठेवावे, पालकांनी शाळेच्या विरोधात आंदोलन करु नये अशाप्रकारचे नियम विद्यार्थ्यांना घालण्यात आले होते. या अटींचा भंग केल्यास पालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असंही या नियमांमध्ये नमूद करण्यात आलं होतं. विद्यार्थी आणि पालकांसाठी डायरीमार्फत नियमावली जाहीर करण्यात आली होती. यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. पालकांनी शाळेचा निषेध करत आवाज उठवला. वादग्रस्त नियम आणि अटी घातल्याबद्दल शाळेवर कारवाई करण्याची मागणी पालक करत होते.

त्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल शाळेची चौकशी करण्याचा आदेश दिला. त्यानुसार चौकशी पथक शाळेत दाखल झालं. राज्याच्या शिक्षण उपसंचालिका मिनाक्षी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाच्या समितीने एमआयटी शाळेमध्ये जाऊन शाळा प्रशासनासोबत चर्चा केली. त्यानंतर शाळेने नियम आणि अटी मागे घेण्याचा निर्णय घेतला.

इथून पुढे नियम आणि अटी ठरवताना राज्याच्या शिक्षण उपसंचालिकांच्या सल्ला घ्यावा, अशा सूचना  शाळेला देण्यात आल्या आहेत. मात्र झाल्या प्रकाराबद्दल शाळेवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं.

शाळेच्या डायरीत नमूद केलेले नियम-

- मुलींची अंतर्वस्त्र पांढऱ्या किंवा क्रीम रंगाची असावीत.

- लिपस्टिक, लिप ग्लॉस किंवा अन्य कुठलीही कॉस्मेटिक्स लावायचे नाहीत

- कानातले सोडून कोणतेच दागिने घालायचे नाहीत

- 0.3 cm च्या आकारापेक्षा मोठे कानातले घालायचे नाहीत. त्यांचा रंगही काळा, सोनेरी किंवा चंदेरी असावा.

- सायकलच्या पार्किंगसाठी वार्षिक 1500 फी तसंच हेल्मेट सक्तीचं आहे.

- शाळेच्या परवानगीशिवाय विद्यार्थी आणि पालक, शाळेत किंवा शाळेच्या कॅम्पसच्या बाहेर कुठल्याही सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं नाही.

- विद्यार्थी आणि पालकांनी शाळेविरोधात आंदोलन करु नये

दरम्यान, विद्यार्थ्यांना शिस्त लागावी आणि मुलींची छेडछाड होऊ नये म्हणून हे नियम तयार केल्याचं शाळेच्या प्रशासनाने सांगितलं. मात्र पालकांनी माध्यमांसमोर जाण्याच्या आधी शाळेशी बोलायला हवं होतं, असंही शाळा प्रशासनाने म्हटलं होत.