पुणे : पुण्यातील डीपी रस्त्यावरच्या म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यान नदीपात्रात आणि पूररेषेत येणारी बांधकामं चार आठवड्यात पाडण्याचे आदेश राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरण अर्थात एनजीटीने दिले आहेत. त्याचबरोबर या परिसरात असलेल्या मंगल कार्यालयं आणि लॉन्सला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानग्या सक्तीच्या करण्यात आल्या आहेत.

पर्यावरणाच्या प्रश्नांवर काम करणारे पुण्याचे वकील असीम सरोदे यांच्या याचिकेवर एनजीटीने हा निर्णय दिला आहे.
डीपी रस्त्यावर म्हात्रे पूल ते राजाराम पूल यांच्या दरम्यान दाटी आहे ती मंगल कार्यालयं आणि लॉन्सची. या सगळ्या लॉन्स आणि मंगल कार्यालयांनी त्यांच्या मागून वाहणाऱ्या मुठा नदीपात्रात अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकामं केली आहेत. ही बांधकामं पूर क्षेत्रात असल्यामुळे तातडीनं पाडण्याचा निर्णय एनजीटीनं दिला आहे.

विशेष म्हणजे या परिसरात असलेली कार्यालयं आणि लॉन्स यांच्यामुळे होणारं ध्वनी प्रदूषण, कचऱ्याचं न केलेलं व्यवस्थापन आणि वाहतूक कोंडी यांच्यावरही एनजीटीनं ताशेरे ओढले आहेत. यापुढे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी त्यांना सक्तीची करण्यात आली आहे. शिवाय हा निर्णय देशभरासाठी अंमलात आणला जाणार आहे, हेही या याचिकेचं यश आहे.