पुणे : ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात (Lalit Patil Drug Case) पुणे पोलिसांनी ससून रुग्णलयातील (Sasoon Hospital Drug case) एक कर्मचारी आणि येरवडा कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केलीय, मात्र पोलीस ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवत असल्याचा आरोप करत आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं. ललित पाटील ससून ऐवजी आपल्या सोसायटीत येऊन मुक्कम करायचा असा दावा पुणे कॅम्प भागातील एका सोसायटीतील रहिवाशांनी केल्यानं खळबळ उडालीय. 


ललित पाटीलचे नवे सीसीटीव्ही फुटेज समोर 


ड्रग माफिया ललित पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामध्ये ते निवांतपणे गप्पा मारताना दिसतायत. तो व्हिडीओ पुणे कॅम्प भागातील सेंट्रल पार्क सोसायटीतील आहे. रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहानचे या सोसायटीत दोन फ्लॅट आहेत.  बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून अटक असलेला विनय अरहाना ससुनमधील वॉर्ड नंबर 16 मधे रहात होता. तिथे त्याची ललित पाटील सोबत ओळख झाली. या ओळखीतून ललित पाटील ससुनमधून निघून अरहानाच्या फ्लॅटवर मुक्कामाला जात होता . 


विनय अरहानाच्या इथल्या दोन फ्लॅटसाठी सेपरेट एंट्रन्स तयार करण्यात आल्यानं ललित पाटीलला या  सोसायटीत बिनबोभाट येता येत होतं. इथूनच तो त्याच ड्रग रॅकेट चालवत असल्याचं पुढं समोर आलं. पण आपल्या सोसायटीत इतका गंभीर प्रकार सुरु आहे याचा या सोसायटीतील रहिवाश्यांना थांगपत्ताही नव्हता.


पुणे पोलिसांनी या प्रकरणात ससून रुग्णालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या  महेंद्र शवतेला अटक केली आहे. महेंद्र शेवते हा ललित पाटील आणि ससूनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील दुवा म्हणून काम करत होता. त्यामुळं ससूनचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी करत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं.


ड्रग्ज प्रकरणातील बडे मासे कधी सापडणार?  


ससून पाठोपाठ या प्रकरणात कारवाईचा बडगा आता येरवडा कारागृहातील प्रशासनावर देखील उगारण्यात आलाय. कारागृहातील कॉन्स्टेबल मोईन शेख आणि कौन्सिलर म्हणून काम करणाऱ्या सुधाकर इंगलेला अटक करण्यात आलीय. मात्र महेंद्र शेवते काय किंवा सुधाकर इंगळे काय, हे तर लहान प्यादे होते. ललित पाटील तीन वर्षं ज्यांच्या आशीर्वादानं ससून रुग्णालयात तळ ठोकून होता आणि ज्यांच्या मदतीनं येरवडा कारागृहातून तो ड्रग तयार करणारा कारखाना उभारू शकला, त्या वरिष्ठांपर्यंत पुणे पोलिसांचा तपास पोहचणार का हा खरा प्रश्न आहे . 


ही सोसायटी असेल , इथूनच जवळ असलेलं पंचतारांकित हॉटेल असेल किंवा तिथून जवळ असलेला मॉल असो, ललित पाटील या सर्व ठिकाणी अगदी निवांतपणे वावरायचा. अर्थात हे सगळं वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय होणं शक्य नव्हतं. मात्र पुणे पोलीस कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना वरिष्ठांना वाचवण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना अशी शंका उपस्थित होत आहे. 


ही बातमी वाचा: