पुणे : पुण्यात कोयता गॅंगची दहशत (koyta Gang) संपायचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा कोयता गॅंगने दहशत माजवून उत्तमनगर येथे वाईन्सच्या दुकानांवर दरोडा टाकला आहे. यात तीन लाख रुपयांची रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरल्या आहे. यावेळी 2 जणांनी तलवार हवेत फिरवुन ‘कोणी पुढे आले तर, मारुन टाकेन’ असे बोलत परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेमुळे उत्तम नगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात अज्ञात सहा व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


'जो कोणी मध्ये येईल त्याला मारून टाकेन’


रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. रविवारी रात्री सर्वत्र विश्वचषकाच्या सामन्याची रंगत होती. त्याचवेळी अहिर गेट जवळ मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या आर आर वाइन्स दुकानात दरोडा टाकण्यात आला. यात सहा जण होते. त्यात दोघांनी तलवारी हातात घेऊन दहशत माजवली होती. 'जो कोणी मध्ये येईल त्याला मारून टाकेन’ अशा प्रकारे लोकांना धमकावत तलवार हवेत फिरवली ज्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांनी घाबरुन आपली दुकाने बंद केली. त्यानंतर लगेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यात 20 ते 22 वर्षांच्या वयोगटातील मुलं असल्याचं समोर आलं आहे. 


दहशत कधी थांबणार?


काही दिवसांपूर्वी हॉटेलच्या बिलावरून तीन जणांच्या टोळक्याने हॉटेल चालकावर थेट कोयता उगारला होता. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली होती. सध्या पुण्यात अनेक ठिकाणी कोयत्या गॅंगने दहशत माजवल्याचं मागील काही महिन्यांपासून दिसत आहे. या प्रकरणात तीन जणांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यात मोठ्या प्रमाणात कोयता गँग दहशत माजवताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनीदेखील आता त्यांच्याविरोधात अॅक्शन प्लॅन आखला आहे. पोलीस या टोळीने जिथे दहशत माजवली त्यात परिसरात घेऊन जात त्यांची नागरिकांसमोरच रस्त्यावर वरात काढताना दिसत आहे. पुणे पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवायला देखील सुरुवात केली आहे. त्यामार्फत अनेक गुन्हेगारांचा शोध घेणं सुरु आहे. आतापर्यंत किमान सात ते आठ वेळा कोयता गँगची भररस्त्यात धिंड काढली आहे. तसेच, यापुढेही या टोळीची धिंड काढण्यात येणार आहे. या टोळीत अल्पवयीन मुलांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला; कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह