Pune Bypoll election : कसबा विधानसभा पोटनिवडणूकच्या (Pune Bypoll Election) मतदानाला काही तास बाकी असताना अनेक नाट्यमय घटना घडताना दिसत आहेत. कसबा पोटनिवडणूक रद्द करावी, अशी मागणी अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले (abhijit bichukle) यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अभिजीत बिचुकले हे कसबा पोटनिवडणुकीचे अपक्ष उमेदवार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असताना देखील भाजप आणि कॉंग्रेसने प्रचार केला असल्याचा आरोप अभिजीत बिचुकले यांनी केला आहे. कसब्याचा तिसरा उमेदवार म्हणून मी कसब्याच्या दोन उमेदवारांवर कारवाई करण्याचं पत्र देत असल्याचं ते म्हणाले. ही निवडणूक प्रक्रिया रद्द करा आणि नव्यानं घ्या अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.


भाजपा पक्ष कसब्यात पोटनिवडणुकीत पैसे वाटत असल्याचा आरोप मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. पोलीस प्रशासनदेखील भाजपवर कारवाई करीत नसल्याचा आरोप करीत धंगेकरांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. त्यामुळे भाजपने देखील मतदानावर आक्षेप घेत धंगेकारांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर केलेले उपोषण हा आचारसंहितेचा भंग आहे,  म्हणून ही निवडणुक रद्द करण्याची मागणी बिचुकले यांनी केली आहे. 


भारतीय जनता पक्षाकडून कॉंग्रेसचे कसबा पेठचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर आता अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. रविंद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर आंदोलन करुन आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आणि धंगेकरांच्या सभेत धार्मिक धृवीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल भाजपने तक्रार दाखल करणार आहे. आचारसंहितेचा भंग करत आज रविंद्र धंगेकर उपोषणाला बसले होते असा आरोप भाजपने केला आहे. 


अभिजित बिचुकले हेदेखील कसब्यातून अपक्ष उमेदवार आहे. त्यांनीदेखील मागील काही दिवस प्रचार केला. प्रत्येक दारादारात जाऊन त्यांनी प्रचार केला. काहीही झालं तरी मी निवडणूक लढवीन अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. आज भाजप आणि महाविकास आघाडी यांनी आचारसंहितेचा भंग केला, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूकच घेऊ नका. ती रद्द करा, अशी मागणी केली आहे. भाजपच्या आणि अभिजित बिचुकले यांच्या मागणीवर नेमकं निवडणूक आयोग काय भूमिका घेणार ? हे पाहणं महत्वाचं आहे.