पुणे : वयाच्या चाळीशीत तुम्हाला कॅन्सरचे निदान झाले, त्यात तुमची एक किडनी काढावी लागली, अशात तुमचा वीस वर्षे सुरू असलेला व्यवसाय बंद करण्याची वेळ तुमच्यावर आली तर तुम्ही काय कराल? या प्रश्नांची उत्तरं देणं तर दूरच अनेकजण या धक्क्यातून सावरायचेही नाहीत. पण पुण्याच्या तळेगावमधील गौतम राठोड यांनी या सर्वांवर फक्त मात तर केलीच, पण थेट घरातच केशर शेती फुलविण्याचा यशस्वी प्रयोग सत्यात उतरवला आहे. ऐकून नवल वाटलं ना? पण हे खरेय.  जम्मू-काश्मीरची केशर शेती पुण्यात कशी बहरली ते पाहूयात


आपल्याला आजूबाजूला आपण शेतीचे अनेक प्रकार पाहिले. अनेक युवक शेतीकडे वळू लागल्याने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत केशर हे फक्त जम्मू काश्मीर मध्येच पिकवले जाते, असे आपल्याला माहीत होते. मात्र आता महाराष्ट्रात देखील पिकवले जाते. मावळ तालुक्यातील गौतम राठोड यांना हा प्रयोग यशस्वी करुन दाखवला. कॅन्सरचं निदान झाले, त्यात त्याची एक किडनी निकामी झाल्याने काढावी लागली. तरीही राठोड यांनी हार मानली नाही. किडनी काढावी लागल्याने अवजड कामे करण्यावर बंधने आली. त्यातून त्यांनी खचून न जाता एका नव्या पद्धतीने म्हणजे एरोफोनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांना यश देखील आले.  त्यामुळे काश्मीर प्रमाणे मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे उत्तम दर्जाचे केसर तयार करण्यात आले आहे. त्याची आता चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.


सुरुवातीला गौतम यांनी तळेगाव येथे स्वत:चे गॅरेज सुरू केले होते. त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. मात्र काही दिवस गेल्यानंतर गौतम यांना कर्करोगाचे निदान झाले. कर्करोग शेवटच्या स्टेपला होता. त्यात त्यांना त्यांची किडनी काढावी लागली. किडनी काढली गेल्याने शरीर अधू झाल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे काही प्रमाणात गॅरेजचे काम बंद झाले. आता घर चालवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला. कारण गौतम यांना आता जड काम कधीही करता येणार नव्हते. मग त्याला काय पर्याय शोधावा असा विचार मनात येऊ लागला. त्यातून त्यांनी उभारी घेत शेती करण्याचा निर्णय घेतला. पण  गौतम राठोड यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता. गौतम राठोड यांनी एका छोट्याश्या खोलीत केशर शेतीचा हा यशस्वी प्रयोग केलाय. त्यातून त्यांचा उदर्निवाहसुद्धा चालतोय.