Pune Bypoll election :  कसब्याच्या प्रचाराची मुदत संपली असताना भाजपच्या नेत्यांनी कसब्यात रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करत होते. ही लोकशाहीची हत्या आहे, असा हल्लाबोल कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपवर केला आहे. कसबा मतदार संघात  मतदारांनी मतांसाठी पैसे घेतले असा थेट आरोप कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहेत. ते पत्नीसोबत पुण्याच्या कसबा गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसले आहे. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.  


धंगेकर म्हणाले की, भाजप नेते पोलिसांच्या उपस्थितीत प्रचार करत आहेत. त्यामुळे ही लोकशाहीची हत्या आहे. हा सगळा प्रकार निवडणूक आयोग बघत आहे. तरीदेखील त्यांना निवडणूक आयोगाने नोटीसदेखील दिली नाही आहे. पोलीस माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटीदेखील करत आहे. गुन्हेगार आणि पोलीसही त्यांच्यात सामील झाले आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे. 


पोलीस राजकीय एजंट म्हणून पैसे वाटप करतात: संजय राऊत


पोलीस राजकीय एजंट म्हणून पैसे वाटप करतात हे अनेकदा पुराव्यासहित उघड झालं आहे. सुरक्षितपणे पैसे पोलिसच वाटू शकतात, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊतांनी केला आहे. धंगेकर जर असे आरोप करत असतील तर त्यांच्याकडे पुरावे असतील असंही ते म्हणाले. यापूर्वी भाजप पोलीस  व्हॅनमधून पैसे वाटतात अशी अनेक उदाहरणं समोर आली आहेत. त्यामुळे धंगेकरांच्या आरोपावर आपण विश्वास ठेऊ शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप होत असेल तर  गंभीर बाब: छगन भुजबळ


पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप होत असेल तर ही गंभीर बाब आहे. भाजप कायम यंत्रणेचा वापर करुन घेत असते, असा आरोप भाजपवर कायम होत असतो. आता निवडणुकीसाठी ही पैसे वाटप करत आहेत असं असेल तर हा विषय सगळ्यांनी गंभीरपणे घ्यायला पाहिजे, असं मत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.


दरम्यान, काल चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रोड शो केला. त्यानंतर त्यांनी भाजपच (BJP) जिंकणार असा विश्वास व्यक्त केला.  काल दिवसभर भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात आला. दोन्ही पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रोड शो, पदयात्रा, शक्तीप्रदर्शन आणि घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला.