पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात (Pune Porsche Car Accident) प्रकरणाची सध्या राज्यभर चर्चा आहे. या प्रकरणामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले जात आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणाला हवा मिळाल्यामुळे पुणे पोलिसांवरही चांगलाच दबाव आला आहे. दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच याच पुण्यात हेलावून टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. कर्वे रोडवर एका क्रेनने सायकलस्वाराला चिरडलं आहे. विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर क्रेनचालक पसार झाला होता.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार पुण्यातील कर्वेरोडवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका अवजड क्रेनने सायकलस्वाराला चिरडले आहे. या दुर्घटनेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर क्रेनचालक पसार झाला आहे. मात्र क्रेनचालकाला ताब्यात घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पुण्यात आणखी एक हिट अँड रन प्रकरण
पोर्शे अपघात प्रकरण ताजे असतानाच आता या जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आणखी एक हिट अँड रन प्रकरण समोर आले आहे. या तालुक्यातील एका पोलीस पाटलाच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालवला. हा पिकअप चालवताना मुलीने थेट दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत दुचाकीवरील 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात एवढा गंभीर होता की मालवाहू पिकअपने दुचाकी चालकास 20 ते 30 फूट फरफटत नेलं. मिळालेल्या माहितीनुसार अपघात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव अरुण मेमाणे तर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव महिंद्र बांडे असे आहे.
गुन्हा दाखल, तपास चालू
संतोष लेंडे हे अरणगावातील पोलीस पाटील आहेत. त्यांची अल्पवयीन मुलगी पिकअप चालवत होती.तिच्यासोबत शेजारील सीटवर पोलीस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते.ही मुलगी पिकअप वेगात चालवत होती. त्यामुळे त्या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या दुर्घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तसाप करत आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात पोलिस अल्पवयीन मुलाची चौकशी करणार, दोन तास चौकशीसाठी परवानगी