पुणे : कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात लोकांमधे आता कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचं सेरेलॉजीकल सर्वेक्षणातून समोर आलंय. याचाच अर्थ अर्ध्याहुन अधिक पुणेकरांना कोरोना होऊन गेलाय आणि ते कळालेलं देखील नाही. कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यासाठी ही दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल. अर्थात हे सर्वेक्षण पुण्यातील मध्यवर्ती भागातील पेठांमधे करण्यात आलंय. परंतु संपूर्ण पुण्यात कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव पाहता पुण्यातील इतर भागांमधेही अशीच परिस्थिती असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.


इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च या संस्थेने 20 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण केलंय. त्यासाठी पुण्यातील येरवडा, कसबा पेठ- विश्रामबाग, रास्ता पेठ- रविवार पेठ, लोहिया नगर- कासेवाडी, नवीपेठ- पर्वती या भागातील 1664 नागरिकांची सॅपल्स घेण्यात आली होती. ज्या भागातून ही सॅपल्स ज्या घेण्यात आलीयत त्या भागाची एकूण लोकसंख्या 3 लाख 66 हजार 984 आहे. पाच प्रभागातून रँडम पद्धतीने 1664 व्यक्तींचे नमुणे घेण्यात आले. या प्रत्येक प्रभाणात अँटीबॉडीज आढळून आलेल्यांची संख्या वेगवेगळी होती.


या सर्वेक्षणाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे
- या भागातील 51.05 नागरिकांमधे कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटीबॉडीज आढळून आल्यात.
- कोरोनाची लागण होण्यात पुरुष आणि स्त्री असा भेदभाव दिसून येत नाही. 52.8 पुरुषांना तर 50.1 महिलांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलंय.
- 66 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे 32.6 टक्के आहे. तर सर्वाधिक प्रमाण हे 51 ते 65 वयोगटातील लोकांमधे आहे जे 50 टक्के आहे.
- बैठी घरं, वाडे, चाळ यामधे कोरोनाचे प्रमाण जास्त.
- सार्वजनिक स्वच्छता गृहांचा वापर करणाऱ्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण जास्त आहे.


या सेरो सर्वेक्षणानंतर पुण्यातील इतर भागांमध्ये देखील अशाच प्रकारचं सर्वेक्षण हाती घेण्यात आल्याचं पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलंय. पुणे शहराबरोबरच पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्येही अशाप्रकारचं सर्वेक्षण येत्या काही दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. या पहिल्या सेरो सर्वेक्षणासाठी मध्यवर्ती पुण्यातील ज्या प्रभागांची निवड करण्यात आली होती त्या भागांमध्ये एप्रिल, मे आणि जून महिन्यात पुण्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णाची नोंद झाली होती. परंतु लोकडाऊन शिथिल करताच कोरोनाचा फैलाव शहराच्या इतर भागांमध्येही झाला.


कोरोनाचं नवं हॉटस्पॉट, सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात


देशातील कोरोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण सध्या पुणे शहरात आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली या शहरांनाही पुण्यानं मागे टाकलं आहे. सध्या 41 हजारहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे शहरात आहेत. त्यामुळे पुणे शहर देशातील कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं आहे, असंच म्हणावं लागेल. कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येमध्ये देशाची राजधानी दिल्लीनंतर पुणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. दिल्लीत आत्तापर्यंत दीड लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळलेत. तर पुण्यात आत्तापर्यंत 1 लाख 30 हजार करोना रुग्णांची नोंद झालीय. पुण्याने याबाबतीत 1 लाख 28 हजार कोरोना रुग्णांची नोंद असलेल्या मुंबईलाही मागे टाकलंय.


Pune Corona | देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह कोरोनाबाधित पुणे शहरात; मुंबई, दिल्ली, चेन्नईला मागे टाकलं