पुणे : पुण्यातील मानाच्या गणपती मंडळं आणि प्रमुख गणपती मंडळांनी मोठा निर्णय घेतला आहे. आठ गणेश मंडळांचे पदाधिकारी एकमेकांच्या मंडळांच्या गणेशाचे विधीवत पूजन करणार आहेत. मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या मंडळांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला आहे. गर्दी टाळण्यासाठी आणि परंपरेचं पालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांच्या शुभहस्ते तर श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे तांबडी जोगेश्वरी मंडळाची प्राणप्रतिष्ठापना अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या शुभहस्ते तर अखिल मंडई मंडळाच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या शुभहस्ते होणार आहे. गुरुजी तालीम मंडळाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या शुभहस्ते तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्राणप्रतिष्ठा गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते होईल.


तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या वंशजातील केसरी वाडा गणपतीचे डॉ. दीपक टिळक यांच्या शुभहस्ते तर केसरी वाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना व आरती तुळशीबाग मंडळाच्या पदाधिका-यांच्या शुभहस्ते होणार आहे. गेल्या 128 वर्षात प्रथमच असे घडणार आहे.


Ganeshotsav 2020 | गणेश मूर्तिकांराकडून ऑनलाईन मूर्ती बुक करण्याचीही सोय