पुणे : ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव 2024 ची घोषणा (Pune international film festival) करण्यात आली आहे. येत्या 18 जानेवारी ते 25 जानेवारी हा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे 18 जानेवारीला संध्याकाळी5 वाजता होणार असून, यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रसिद्ध रेडीओ उद्घोषक अमिन सयानी, दिग्दर्शक-अभिनेते गौतम घोष आणि प्रसिद्ध नृत्यांगना-अभिनेत्री लीला गांधी यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’, तर संगीत संयोजक, गायक आणि गीतकार एम. एम. कीरवानी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा, आज महोत्सवाचे संचालक डॉ, जब्बार पटेल यांनी केली.
उद्घाटन सोहळ्यानंतर ‘अ ब्रायटर टुमारो’ (इटली, दिग्दर्शक – नानी मोरेत्ती) हा उद्घाटनाचा चित्रपट (ओपनिंग फिल्म) दाखवण्यात येणार आहे, तर ‘कीडनॅप्ड’ (इटली, दिग्दर्शक – मार्को बेलोचिओ) या चित्रपटाने महोत्सवाची (क्लोजिंग फिल्म) सांगता होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.
हे वर्ष सदाबहार अभिनेते देव आनंद (26 सप्टेंबर 1932), गायक मुकेश (22 जुलै 1923), दिग्दर्शक मृणाल सेन (14 मे 1923), प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक एनटीआर (28 मे 1923), संगीत दिग्दर्शक सलिल चौधरी (19 नोव्हेंबर 1923) आणि गीतकार शैलेन्द्र (10 ऑगस्ट 1923) यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.
कोण असणार ज्युरी?
यावेळी महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय ज्यूरींच्या नावाचीही घोषणा करण्यात आली. यामध्ये पेट्र झेलेन्का – (झेक प्रजासत्ताक - नाटककार आणि दिग्दर्शक), शाई गोल्डमन (इस्रायल - सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपट निर्माता), सुधीर मिश्रा (भारत - चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक), मंजू बोराह (भारत - चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक), सेतारेह इस्कंदरी (इराण – अभिनेत्री), उमरान सफ्तेर (तुर्कस्तान - चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता), सू प्राडो (फिलिपाईन्स - अभिनेत्री) आणि विसाकेसा चंद्रसेकरम (श्रीलंका - चित्रपट दिग्दर्शक, लेखक, नाटककार) यांचा समावेश आहे.
विविध विषयांवर मास्टर क्लास
या महोत्सवात विकास खार्गे, अविनाश ढाकणे, जानू बरुआ, शाई गोल्डमन, मनोज वाजपेयी यांचे विविध विषयांवर मास्टर क्लास होणार आहेत. ‘नव्या मराठी सिनेमाच्या शोधात’ या विषयावर परिसंवाद होणार असून, त्यामध्ये निखिल महाजन, वरून नार्वेकर, रितेश देशमुख, मंगेश देसाई आणि संजय कृष्णाजी पाटील सहभागी होणार आहेत. तसेच चित्रपट महोत्सवांचे भविष्य आणि महत्त्व या विषयावरील परिसंवादामध्ये सैबल चटर्जी, बीना पॉल, एडवीनास पुकास्ता सहभागी होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.
कुठे होणार स्क्रिनिंग?
18 ते 25 जानेवारी दरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव 2024’ होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (6 स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (3 स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपट गृहात (2 स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण 11 स्क्रीनवर चित्रपट दाखविले जाणार आहेत.
नोंदणी शुल्क किती?
महोत्सवासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली असून, चित्रपटगृहांवर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सुरू झाली आहे. रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठी नोंदणी शुल्क रुपये 800 फक्त आहे.
पुरस्काराचे मानकरी
अमीन सयानी
अमीन सयानी हे भारतातील लोकप्रिय माजी रेडिओ उद्घोषक आहेत. रेडिओ सिलोनवर ‘बिनाका गीतमाला सादर करीत अमीन सयानी यांनी संपूर्ण भारतीय उपखंडात प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली. पारंपरिक "भाईयो और बहनो"च्या विरूद्ध "बेहनो और भाईयो" प्रेक्षकांना संबोधित करण्याची त्यांची शैली अजूनही लोकप्रिय मानली जाते. त्यांनी 1951 पासून 54 हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि 19 हजार जिंगल्सची निर्मिती केली आहे. सीबाका/ बिनाका त्यांनी अगोदर रेडिओ सिलोनवर आणि नंतर विविध भारतीवरून एकूण 42 वर्षांहून अधिक काळ प्रसारीत केले आणि ऑल इंडिया रेडिओ लोकप्रिय करण्यात मदत केली. महात्मा गांधींच्या सूचनेनुसार सुरू झालेले ‘राहबर’ या पाक्षिकाचे संपादन, प्रकाशन आणि छापण्यात सयानी यांनी त्यांची आई कुलसुम सयानी यांना मदत केली होती.
गौतम घोष
अनेक राष्ट्रीय पुरस्कार नावावर असणारे गौतम घोष हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, संगीत दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यांनी प्रामुख्याने बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना 1997 मध्ये इटलीतील "व्हिटोरियो डी सिका" हा पुरस्कार मिळाला असून, हा पुरस्कार प्राप्त करणारे ते एकमेव भारतीय आहेत. 2013 मध्ये, पश्चिम बंगाल सरकारने त्यांना ‘बंग बिभूषण’ देऊन सन्मानित केले आहे. चित्रपटातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन, त्यांना जुलै 2006 मध्ये ‘स्टार ऑफ द इटालियन सॉलिडॅरिटी नाइटहूड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
लीला गांधी
1951 साली नृत्य दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या लीला गांधी यांनी पुढे मास्टर भगवान यांच्या ‘रंगीला’ (1953), ‘हल्लागुल्ला’ (1954) व ‘भला आदमी’ (1958) या चित्रपटांत नृत्य करत पदार्पण केले. ‘बस कंडक्टर’ या चित्रपटात तर त्यांनी हेलनबरोबर नृत्य केले होते. राजा ठाकूर यांच्या ‘रेशमाच्या गाठी’ या कार्यक्रमात ‘इष्काच्या रंगात वीज भरे अंगात’ या गाण्यावर त्यांनी नृत्य केले होते. त्यानंतर ‘प्रीतिसंगम’ (1957)मधील त्यांचे नृत्य गाजले. ‘सांगत्ये ऐका’पासून (1959) त्यांनी अनेक चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन केले, तर ‘केला इशारा जाता जाता’ (1965) या चित्रपटाच्या त्या सहनायिका होत्या. चित्रपटांबरोबरच त्यांचा नाट्यप्रवासही चालू होता. 75 चित्रपटात आणि 25 नाटकांत त्यांनी काम केले आहे.
एम. एम कीरवानी
पद्मश्री कोडुरी मारकथमणी कीरवानी हे एम. एम. कीरवानी म्हणून प्रसिद्ध आहेत. संगीत संयोजक, रेकॉर्ड निर्माते, गायक आणि गीतकार अशा अनेक भूमिकांमध्ये त्यांचे काम आहे. त्यांनी प्रामुख्याने तेलुगू चित्रपटात काम केले आहे.
कीरवानी यांनी हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांसाठीही काम केले. क्षाना क्षनम, घराना मोगुडू, अल्लारी प्रियुडू, क्रिमिनल, सुभा संकल्पम, पेल्ली संदादी, देवरागम यांसारख्या रचनांसाठी ते प्रसिद्ध आहेत. तसेच अन्नमय्या (1997), जख्म (1998), स्टुडंट नंबर १ (2001), जिस्म (2003), पहेली (2005), मगधीरा (2009), बाहुबली (2015), आणि आरआरआर (2022), हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. त्यांच्या बहुतेक रचना एस. पी. बालसुब्रह्मण्यम आणि के. एस. चित्रा यांनी जिवंत केल्या आहेत.
त्यांना 11 नंदी पुरस्कार, 8 फिल्मफेअर पुरस्कार, 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक अकादमी (ऑस्कर) पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 2023 मध्ये, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे.
इतर महत्वाची बातमी-