पुणे : पीएमआरडीएचा विकास आराखडा एक वर्षाच्या आत बनवणार असल्याची माहिती पालकमंत्री आणि पीएमआरडीएचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी दिली. पीएमआरडीसंदर्भातील बैठकीनंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.


पीएमआरडीएची हद्द निश्चित करणारा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यावर पुणेकरांना दोन महिन्यात सूचना आणि हरकती घेता येणार आहेत. त्यानंतर पीएमआरडीएची हद्द निश्चित होईल.

हद्दीचा नकाशा निश्चित झाल्यानंतर एक वर्षात विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचं काम पीएमआरडीए करणारा आहे. त्यामुळे पीएमआरडीएचा नवा विकास आराखडा कसा असेल, याकडे पुणेकरांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, मेट्रो प्रकल्पासाठी त्या मार्गाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामाचं टेंडर निघणार आहे.

याबाबात अधिक माहिती देताना गिरीश बापट म्हणाले की, ''पीएमआरडीएचा विकास आराखडा एका वर्षाच्या आत बनवणार आहोत. त्यासाठी आज पुण्याचं क्षेत्रफळ किती असावं याबाबतची चर्चा होऊन हद्द निश्चिती करण्यात आली. यावर कुणाला आक्षेप असल्यास, दोन महिन्याच्या आत, त्यावर हरकत घेता येईल. त्यानंतर सीमा निश्चितीमध्ये विकास कसा करायचा? यासाठीचा हा विकास आराखडा असेल.''