पुणे : रामनाथ कोविंद यांच नाव राष्ट्रपतीपदासाठी जाहीर करणं, हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा क्रांतिकारक निर्णय असून भाजप दलितविरोधी नाही, हे यातून स्पष्ट होत आहे, असे रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते.
एवढ्या मोठ्या पदावर दलित समाजाच्या व्यक्तीला भाजप संधी देईल, असं विरोधकांना वाटत नव्हतं. मात्र, हा विरोधकांना धक्का असून मोदी आणि शाह यांनी दलितांना दुसऱ्यांदा न्याय दिल्याचं आठवले म्हणाले.
“राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांचं नाव देणं, हा सगळ्यांना समाधान देणारा निर्णय आहे. उद्धव ठाकरे रामनाथ यांच्या नावाला विरोध करणार नाही, असं वाटतं आहे. त्यांची उद्या भेट घेणार आहे.”, असेही आठवलेंनी सांगितले.
दलित समाजाचा व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर जात असल्याने विरोधकांनी त्याला विरोध करु नये, ही विरोधकांना विनंती असल्याचं आठवले म्हणाले. तसेच, “कोविंद यांचे नाव जाहीर करुन भाजपने विरोधकांची तोंडे बंद केली आहेत. या निर्णयाने भारतीय जनता पार्टी दलित विरोधी नाही हे स्पष्ट होईल. हा पक्ष सातत्याने दलित, मागासवर्गीय लोकांच्या उत्कर्षासाठी काम करत आहे. त्याप्रमाणे इतर पक्षांनीही विरोधाचे राजकारण न करता दलित उमेदवाराला साथ द्यावी”, असे आवाहनही आठवले यांनी विरोधकांना केले आहे.
दरम्यान, रामनाथ कोविंद यांच नाव राष्ट्रपतीपदासाठी जाहीर झाल्याचं निमित्त साधत रिपाइंकडून पुण्यात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.