पुणे : सोनं हा सगळ्यात महागडा धातू समजला जातो, त्यामुळे सोन्याचा (Gold) वापर करुन मौल्यवान वस्तू बनवतात. अनेकदा सोन्याच्या कलाकारीत देवांच्याही मूर्ती घडवल्या जातात. अशीच एक तब्बल 111 वर्षे जुनी गोल्डन दत्त मूर्ती समोर आली आहे. पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 111 वर्षे जुनी सोन्याच्या दत्ताची मूर्ती पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचं चित्र आहे. येथे 111 वर्षांपूर्वी कोलकत्तावरुन आलेल्या एका भक्ताने पुण्यातील (Pune) श्री समर्थ सद्गुरु नारायण महाराज ट्रस्टला ही साडेतीन किलो सोन्याची दत्ताची मूर्ती भेट म्हणून दिली होती. मात्र, ही मूर्ती कुठेही बाहेर ठेवली तर ती तिच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे श्री सद्गुरु नारायण महाराज दत्त संस्थान ट्रस्टकडून ही मूर्ती गेले 60 वर्षांपासून बँक ऑफ महाराष्ट्राच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आली आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने ही मूर्ती लॉकरमधून बाहेर काढण्यात आली असून भाविकांनी गोल्डन मूर्ती पाहणीसाठी व दर्शनासाठी गर्दी केली आहे.
बाजार भावानुसार सध्या सोनं 80 हजार रुपये तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80 हजार असून 100 ग्रॅम सोन्याची किंमत 8 लाख रुपये होते. या बाजार मुल्यानुसार 1 किलो सोन्याची किंमत 80 लाख रुपये होते. त्यामुळे, सोन्याच्या वस्तू किंवा मूर्तीचं संरक्षण ही मोठी जबाबदारी असते. म्हणूनच, त्यामुळे श्री सद्गुरु नारायण महाराज दत्त संस्थान ट्रस्टकडून ही साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त यांची मूर्ती लॉकरमध्ये ठेवली जाते. दरवर्षी दत्त जयंतीच्या पूर्वी असलेल्या गुरुवारी ही मूर्ती याच बँकेमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. आज त्याच निमित्ताने लोकांनी या सुंदर दत्ताच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. इतर वेळेस बँकेत लोकांची गर्दी त्यांच्या व्यवहार किंवा पैसे काढण्यासाठी असते. मात्र, आजची ही गर्दी फक्त दत्त महाराजांच्या दर्शनासाठी होती.
किंमत 3 कोटींच्या घरात
या साडेतीन किलो सोन्याच्या दत्ताच्या मूर्तीची किंमत कोट्यावधी रुपये आहे. बाजार भावानुसार जवळपास 2 कोटी 80 लाख रुपयांपर्यंत ही किंमत जाऊ शकते. त्यामुळे, या सोन्याच्या मूर्तीची विशेष सुरक्षा बाळगण्यात येते. श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने वर्षातून फक्त एकच दिवस ही मूर्ती लोकांच्या दर्शनासाठी बाहेर काढली जाते. त्यानंतर, पुन्हा एकदा ती याच बँक ऑफ महाराष्ट्राच्या लॉकरमध्ये ठेवलेली असते. त्यामुळे, वर्षातून एकदाच दर्शन देणाऱ्या दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची बँकेत गर्दी होते.
हेही वाचा
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश