गेल्या वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी चोरट्यांनी काही तासात 14 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावली होती. तसाच काहीसा प्रकार आज अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशी घडला. एका तासाच्या कालावधीत चोरट्यांनी एकापाठोपाठ एक अशा सहा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरली.
तासाभराच्या कालावधीत घडलेल्या या घटनांमुळे पुणे शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पहिली घटना घडली. जगताप चौकातून पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेलं.
VIDEO | पुण्यात सोनसाखळी चोर सक्रिय, सहा महिलांची मंगळसूत्र हिसकावली
त्यानंतर विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या हद्दीतील फडके हॉल आणि लोखंडे तालीम जवळ दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी पादचारी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावली. असेच प्रकार समर्थ पोलिस स्टेशन, फरासखाना आणि बिबवेवाडी पोलिसांच्या हद्दीत घडले.
या सर्व घटनांमधे चोरट्यांनी प्रामुख्याने सकाळी फिरायला आलेल्या ज्येष्ठ महिलांना लक्ष्य केल्याचं दिसून आलं. पोलिसांना याची माहिती मिळेपर्यंत चोरटे पसार झाले होते. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरात नाकाबंदी लावली असून चौकाचौकातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत आहे.