पिंपरी : दाताच्या शस्त्रक्रियेवेळी अतिरक्तस्त्राव झाल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडच्या आयुर्वेद रुग्णालय, स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. धनश्री जाधव असं 19 वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीला प्राण गमवावं लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
धनश्रीवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर पाटील दाम्पत्य सध्या संपर्काबाहेर आहेत. धनश्रीच्या दातांमध्ये जन्मजात दोष ( Crouzon's syndrome ) होता. त्यावर शस्त्रक्रिया करून ते दोष दूर करायचे होते. म्हणून राम पाटील आणि अनुजा पाटील या डॉक्टर दाम्पत्याने 23 एप्रिलला शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
दुपारी 12 वाजता सुरू झालेली शस्त्रक्रिया साधारण 4 ते 5 वाजेपर्यंत संपणं अपेक्षित होतं. मात्र बारा तास झाले तरी शस्त्रक्रिया सुरूच होती. दरम्यान तिच्या नाका-तोंडातून अतिरक्तस्राव सुरू झाला. ठणठणीत बरी असणाऱ्या धनश्रीला बारा तासात आयसीयूत दाखल करण्याची वेळ आली.
स्टर्लिंग हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात तिच्यावर उपचार सुरू झाले. तोपर्यंत तिचा ब्लडप्रेशर कमी होऊन 60 वर येऊन ठेपला होता. तिच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या मात्र तिचं ब्रेन डेड झालं होतं. अशातच उपचारादरम्यान तिची मृत्यूची झुंज संपली आणि सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला.
डॉक्टर पाटील दाम्पत्याचा हलगर्जीपणा धनश्रीच्या जीवावर बेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आता रुग्णालय प्रशासनाने तातडीनं दंत चिकित्सालय सील केलं आहे. पाटील दाम्पत्याला हे चिकित्सालय भाडे तत्वावर वापरायला दिलं होतं. त्यामुळं आमचा आणि त्यांचा भाडे करारापलीकडे काही संबंध नसल्याचे म्हणत प्रशासनाने हात वर केले आहेत.
दाताच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांचा हलगर्जीपणा, पिंपरीत 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 May 2019 05:13 PM (IST)
डॉक्टर पाटील दाम्पत्याचा हलगर्जीपणा धनश्रीच्या जीवावर बेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आता रुग्णालय प्रशासनाने तातडीनं दंत चिकित्सालय सील केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -