मुंबई : आंतरजातीय प्रेमप्रकरणाला विरोध करणाऱ्या जन्मदात्या आई-वडिलांकडूनच जीवाला धोका असल्याचा आरोप करत, एका 19 वर्षीय युवतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या तरुणीतर्फे दाखल करण्यात आलेली याचिका सोमवारी (6 मे) हायकोर्टात सादर करण्यात आली. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे यावर मंगळवारी (7 मे) तातडीची सुनावणी होणार आहे.
पुण्यात राहणाऱ्या या महाविद्यालयीन तरुणीने स्वतःचा आणि प्रियकराचा जीव वाचवण्याची मागणी करत अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. तरुणीचे एका युवकावर प्रेम आहे, मुलगा दुसऱ्या जातीतला असल्यानं या प्रेमसंबंधांना आणि लग्नाला तिच्या आई-वडिलांचा आणि इतर नातेवाईकांचा विरोध आहे. लग्न केलं तर नातेवाईकांकडून आपल्या आणि प्रियकराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणी घरच्यांच्या त्रासाला कंटाळून युवतीने एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला आहे.
अहमदनगरमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयाला पेटवलं
याचिकादार मुलगा हा अनुसूचित समाजातील असल्यामुळे घरचे या विवाहाला समंती देत नाहीत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. "संबंधित तरुण गरीब असला तरी त्याच्याबरोबर मी सुखी राहीन आणि सज्ञान असल्याने मला कोणा बरोबर राहायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार आहे," असं या याचिकेतून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे
आई-वडील आणि अन्य नातेवाईकांकडून संरक्षण मिळावं आणि मनाप्रमाणे जगण्याचा मूलभूत अधिकार मिळावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसंच तिला घरामध्ये डांबून ठेवणाऱ्यांवरही तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.
आंतरजातीय प्रेमाला विरोध करणाऱ्या आई-वडिलांविरोधात पुण्यातील तरुणीची हायकोर्टात याचिका
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
06 May 2019 02:42 PM (IST)
पुण्यात राहणाऱ्या या महाविद्यालयीन तरुणीने स्वतःचा आणि प्रियकराचा जीव वाचवण्याची मागणी करत अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -