पुणे : नुकत्याच कचराकोंडीनं वैतागलेल्या पुणेकरांची पुन्हा एकदा कचराकोंडी होण्याची शक्यता आहे. कारण उरुळी देवाची आणि फुरसुंगीचे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आज शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून पुन्हा आंदोलन सुरु करणार असल्याचं ग्रामस्थांकडून स्पष्ट करण्यात आलं. मात्र पालिका आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.


वारंवार आंदोलन करणाऱ्या फुरसुंगीवासियांनी कचरा प्रश्नावर आक्रमक होत 14 एप्रिलपासून आंदोलन छेडलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर 7 मे रोजी पुण्याची कचराकोंडी फोडण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलं होतं. फुरसुंगीकरांनी तब्बल 23 दिवस पुण्याची कचराकोंडी केली होती. मुख्यमंत्र्यांनी आंदोलक ग्रामस्थांकडे एका महिन्याचा अवधी मागितला होता. या एका महिन्यात मुख्यमंत्र्यांनी महापालिका आणि राज्य सरकार मिळून आराखडा सादर करेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र आज एका महिन्यानंतरही मुख्यमंत्र्यांकडून कोणताही आराखडा सादर न झाल्यानं फुरसुंगीकरांनी पुन्हा आंदोलन छेडलं आहे.

आजपासून पुन्हा कचरा आंदोलन करण्याचा निर्णय फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील महिन्यात पुण्यातील कचरा आंदोलनाची कोंडी फोडताना एक महिन्याच्या आत पुण्यातील कचऱ्याच्या प्रक्रियेचा आराखडा सादर केला जाईल असं सांगितलं होतं. आज त्या आश्वासनाला एक महिना पुर्ण झाला. मात्र उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावातील ग्रामस्थांना आराखडा आणि कचऱ्याचं ओपन डंपिंग कधी बंद होणार याची माहिती न मिळाल्याने आज सकाळी दहा वाजल्यापासून कचऱ्याच्या गाड्या कचरा डेपोमधे येऊ न देण्याचा निर्णय दोन गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय दिली आश्वासनं?

  • एक महिन्याचा अवधी

  • एका महिन्यात कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्लॅन बनवणार

  • ग्रामस्थांच्या मागण्यांविषयी चर्चा करु

  • पुण्यातला कचरा विकेंद्रीत पद्धतीनं कसा जिरवता येईल याचा प्लॅन बनवणार

  • नवीन तंत्रज्ञानातून कचऱ्यावर प्रक्रिया करणार

  • यासाठी बृहत प्लॅन आखणार

  • फुरसुंगीतून जमिनीच्या कॅपिंगचाही विचार करणार

  • एका महिन्यात बाबी मांडणार

  • नोकऱ्यांची विशेष बाब म्हणून कायमस्वरुपी नोकरी देणार

  • नुकसानभरपाई कशी देता येईल याचाही विचार


काय आहे पुण्याचा कचरा प्रश्न?

पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला आहे.

इतकंच नाही तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलनही केलं आहे. 14 एप्रिलपासून फुरसुंगीकरांनी आंदोलन सुरु केलं होतं. 7 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर फुरसुंगीकरांनी आंदोलन स्थगित केलं होतं.

पुणे शहरातून दिवसाला जवळपास 1700 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. यापैकी जवळपास 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. राहिलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर फेकला जातो.

संबंधित बातम्या :

अखेर 23 दिवसांनी पुण्याची कचराकोंडी फुटली!


पुणे कचरा प्रश्न न सुटल्यास राजीनामा देऊ : मंत्री विजय शिवतारे


शिवसेनेने पुणे महापालिकेसमोर कचरा फेकला


पुण्यातील कचराकोंडी 20 व्या दिवशीही कायम


19व्या दिवशीही पुण्यातील कचराकोंडी कायम, सर्वत्र घाणीचं साम्राज्य


आयुक्त कुणाल कुमार पुण्यात, फुरसुंगी कचरा डेपोला भेट


पुण्याचा ‘कचरा’, सांस्कृतिक राजधानीची ‘कोंडी’


ग्रामस्थांकडून फुरसुंगी कचरा डेपोची अंत्ययात्रा, तर मनसेचंही आंदोलन


पुण्याच्या कचराप्रश्नी आता पंतप्रधान मोदींनी लक्ष द्यावं: सुप्रिया सुळे