पुण्यातील कचरा टाकू देणार नाही ही भूमिका घेत फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांनी आंदोलन छेडलं होतं. 23 दिवसांपासून आंदोलन सुरु असल्यामुळे पुणे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. दरम्यान काल राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काल फुरसुंगी ग्रामस्थांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला होता. तसंच हा प्रश्न निकाली न काढल्यास आंदोलन छेडू, प्रसंगी राजीनामे देऊ अशीही भूमिका घेतली होती. मात्र आज स्वत: मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेऊन एक महिन्याचा अवधी मागितला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर फुरसुंगी ग्रामस्थांनी आपलं 23 दिवसांपासून सुरु असलेलं आंदोलन मागे घेतलं आहे. लवकरच महापालिका आणि राज्य सरकार दीर्घकालीन आराखडा बनवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी काय दिली आश्वासनं?
- एक महिन्याचा अवधी
- एका महिन्यात कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्लॅन बनवणार
- ग्रामस्थांच्या मागण्यांविषयी चर्चा करु
- पुण्यातला कचरा विकेंद्रीत पद्धतीनं कसा जिरवता येईल याचा प्लॅन बनवणार
- नवीन तंत्रज्ञानातून कचऱ्यावर प्रक्रिया करणार
- यासाठी बृहत प्लॅन आखणार
- फुरसुंगीतून जमिनीच्या कॅपिंगचाही विचार करणार
- एका महिन्यात बाबी मांडणार
- नोकऱ्यांची विशेष बाब म्हणून कायमस्वरुपी नोकरी देणार
- नुकसानभरपाई कशी देता येईल याचाही विचार
काय आहे पुण्याचा कचरा प्रश्न?
पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला आहे.
इतकंच नाही तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरु आहेत. 14 एप्रिलपासून फुरसुंगीकरांनी आंदोलन सुरु केलं आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
पुणे शहरातून दिवसाला जवळपास 1700 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. यापैकी जवळपास 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. राहिलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर फेकला जातो.
संबंधित बातम्या :