पुणे : भाजप खासदार संजय काकडेंची कन्या आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलाच्या शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडत आहे. लग्नात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्यानं
काकडेंवर टीकेची झोड उठली. त्यानंतर काकडेंनी सारवासारव करण्यासाठी आपली बाजू मांडली आहे.

राज्यातील गरजू मुलांना आपण तब्बल एक कोटींची मदत करणार आहोत. यासाठी 100 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकणार आहे, असं स्पष्टीकरण काकडे यांनी दिलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपूर्द केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

न्यूकोपरे गावातील रहिवाशांचं पुनर्वसन झालेलं नसतानाही काकडे मुलीच्या लग्नात लाखोंची उधळपट्टी करत असल्याने टीका झाली होती. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करुन एक प्रकारे काकडेंनी या प्रकरणावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे.



सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख आणि खासदार संजय काकडे यांची कन्या कोमल यांचा विवाह पुण्यातील म्हालुंगे बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे.

संजय काकडे यांच्या कंपनीने न्यूकोपरे गावातील नागरिकांचं पुनर्वसन रखडवलं आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी आंदोलनही केलं होतं. मात्र त्यानंतरही संजय काकडेंनी त्यांचं पुनर्वसन केलं नाही. मात्र मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी सुरु असल्याने टीकेची झोड उठली आहे.

संबंधित बातम्या :


देशमुखांचा मुलगा आणि संजय काकडेंच्या मुलीचा शाही विवाह