पुणे : पुण्यातील मंडळांमध्ये मतमतांतर नाहीत, लवकरात लवकर विसर्जन(Pune Ganeshotsav 2023)  पार पाडणार, असा दावा कसबा गणपती (kasba ganpati) अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी केला. मागील दोन दिवसांपासून विसर्जन मिरवणुकीवरुन पुण्यातील मंडळांमध्ये मतभेद बघायला मिळाले. मिरवणुकीत सहभागी होण्याच्या मंडळांच्या क्रमांकावरुन काही प्रमाणात वादही बघायला मिळाला होता. 


ते म्हणाले की, विसर्जन मिरवणूक लवकर संपावी म्हणून आम्ही वादकांची संख्या कमी केली आहे. पुण्यातून देशाला सामाजिक संदेश देण्यासाठी गणपती मंडळांनी पुढाकार घेतलेला आहे. काहीही करून कसबा गणपती अल्का चौकात दुपारी 3:30 पोहचेल आणि विसर्जन 4:15 पर्यंत होईल. त्यामागील मानाचे चार ही गणपती मिरवणुकीत अंतर ठेवणार नाहीत. दगडूशेठ गणपती 4:30 वाजता मिरवणुकीत सहभागी होतील. भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडई गणपती, बाबू गेनू, जिलब्या मारुती सह अन्य गणपती हे सुद्धा वेळेतच मिरवणूक संपवतील.


मिरवणुका लवकर संपवण्याचं उद्दीष्ट 


यंदाच्या मिरवणुका लवकर संपवण्याचं उद्दीष्ट पुण्याच्या प्रत्येक गणेश मंडळासमोर आहे. त्यामुळे त्याप्रमाणे प्रत्येक मंडळं कार्य करत आहे. 10 दिवस गणपतीची सेवा करुन आज पुणेकर बाप्पाला निरोप देणार आहे. त्यासाठी लक्ष्मी रोडवर प्रचंड प्रमाणात गर्दी झाली आहे. मानाचा पहिला गणपती उत्सवमंडळातून मंईत परिसराकडे रवाना झाला आहे. पारंपारिक पद्धतीने पालखीत दिमाखात विराजमान होऊन कसबा गणपती मंडईकडे रवाना झाला आहे. यावेळी कलावंत ढोल ताशा पथकाचं वादन सुरु आहे आणि प्रभाग बॅंडचंदेखील सादरीकरण सुरु आहे. 


मागील वर्षी झालेल्या विलंबामुळं इतर मंडळांची नाराजी


मागीलवर्षी काही गणेश मंडळांनी अलका चौकात ठाण मांडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांना स्वतः रस्त्यावर उतरून विसर्जन मिरवणूक मार्गस्थ करावी लागली होती. या विलंबामुळं इतर मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं यावेळी विसर्जन मिरवणुक वेळेत पार पाडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.


पोलिसांची मोठी भूमिका


हिंदू धर्मशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या आधी गणेशाचं विसर्जन होणं अपेक्षित असतं. मात्र, गणेशोत्सवाच्या नऊ दिवसांत सगळे विधी आणि सोहळे यथासांग पार पडणारी अनेक मंडळ दहाव्या विसर्जनाच्या दिवशी मात्र उन्मादी अवस्थेला पोहचतात. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत गेली काही वर्ष त्यामुळेच अनेकदा तणावाचं वातावरण निर्माण होत . ती टाळण्याची जबाबदारी या गणेश मंडळांची तर आहेच पण सर्वात मोठं कर्तव्य आहे ते पोलिसांचं. पुणे पोलीस बोटचेपी भूमिका घेतात की नियमांवर बोट ठेवतात यावर पुण्यातील विसर्जन मिरवणूक कशी पार पडणार हे ठरणार आहे.


इतर महत्वाची बातमी-


Pune Ganeshotsav 2023 : विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळं अन् ढोल ताशा पथकांसाठी महत्त्वाची माहिती, यंदा अलका टॉकीज चौकात...