पुणे : पुणे शहरातील गणेशोत्सवादरम्यान गणेश (Pune Crime News) मंडळांचे देखावे पाहण्यासाठी देशाच्या जगभरातील कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने पुण्यात येत असतात. गर्दीचा फायदा घेत काही चोर हे गणेश भक्तांचे मोबाइल लांबवतात. अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसतंय मात्र ज्यांचा मोबाईल चोरीला जातोय त्यासंदर्भात गुन्हाच दाखल होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे लाखोंच्या संख्येने भाविक बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यात येतायत कारण पुण्याचे आणि या उत्सवाचे एक वेगळे नाते आहे. याच गर्दीचा फायदा मात्र मोबाईल चोरांना होतोय असं दिसतंय. कारण पुणे पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाउंड’ (Lost and Found) या ऑनलाइन पोर्टलवर गणेशोत्सवादरम्यान 900 हून अधिक मोबाईल चोरीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र ही संख्या अजून खूप मोठी असण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या बाजूला, मात्र ज्या व्यक्तींचा मोबाईल चोरीला जातो आहे त्यांच्यातर्फे तक्रार दाखल होत असली तरीसुद्धा पोलीस मात्र गुन्हा दाखल करून घेत नसल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळतंय. तक्रार घेतली असल्याचे सांगत पोलीस यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यात गणेशोत्सव दरम्यान मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल नसल्याची माहिती स्वतः पोलिसांनी दिली आहे. एकूणच काय तर ज्या लोकांचे मोबाईल चोरीला जात आहेत. त्यांना हातात एफआयआर प्रत मिळत नसल्याने मोठी अडचण येऊ शकते. कारण कंपनी कडून डेटा रिकव्हरी असेल किंवा इन्शुरन्स असेल तर त्याला गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. आता यातून पोलीस कसा मार्ग काढतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गणेशोत्सवाच्या गर्दीमध्ये आपल्या साहित्याची काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते जर व्यवस्थित पार पाडलं तर पोलिसांना दोष देण्याची वेळच येणार नाही. मात्र मोठ्या प्रमाणात मोबाईलची चोरी होत असेल तर पोलिसांनी गुन्हे नोंद न करून आपली जबाबदारी टाळून सुद्धा चालणार नाही. गणेशोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या दिमाखदार मिरवणुका काढून विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या लाखोंच्या संख्येत नागरिक एकत्र येतील. याच दरम्यान गर्दीचा फायदा घेत मौल्यवान वस्तू चोरी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तुंची काळजी घ्य़ावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.