पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यावरुन (Pune Ganeshotsav 2023) पुण्यातील महत्वाच्या गणेश मंडळांमध्ये मतभेद दिसून येत आहेत . श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाने आपण यावर्षी दुपारीच मिरवणुकीत सहभागी होऊ, असं जाहीर केलं आहे . मात्र इतर प्रमुख गणेश मंडळांनी आपण दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या क्रमानुसार विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ असं म्हटलं आहे. त्यामुळं पुण्यातील विसर्जन मिरवणूक व्यवस्थित आणि वेळेत पार पाडण्याचं आवाहन पुणे पोलिसांसमोर असणार आहे. 


पुण्यातील गणेशोत्सव जेवढा खास असतो तेवढीच विसर्जन मिरवणूक देखील विशेष असते. सकाळी दहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानांत पाच मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्यावर दाखल होतात. संध्याकाळपर्यंत मानाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर इतर गणपती मंडळं पोलिसांनी ठरवून दिलेल्या क्रमाने लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र दरवर्षी विसर्जन मिरवणुक पार पडण्याचा वेळेत वाढ होत असल्याचं दिसून आलं.  मागील वर्षी काही गणेश मंडळांनी अलका चौकातून विसर्जन मिरवणूक पुढे नेण्यास कित्येक तास लावल्यानं दगडूशेट हलवाई गणपतीला विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास दुसरा दिवस उजाडला होता. त्यामुळं यावर्षी दुपारीच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ असं जाहीर केलं आहे. 



पुण्यातील भाऊ रंगारी , बाबू गेनू , मंडई आणि राजाराम गणेश मंडळाने मात्र आपण ठरलेल्या क्रमानुसार संध्यकाळीच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ, अशी भूमिका घेतली आहे . विसर्जन मिरवणुकीसाठी या गणेश मंडळांकडून सुंदर रथ तयार केले जातात आणि त्या रथांना आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास मध्यरात्र उलटून जाते. काही मंडळांना तर दुसरा दिवस उजाडतो. त्यामुळं अनेकदा मंडळा - मंडळांमध्ये तणावाची परिस्थिती देखील निर्माण होते. मात्र ठरलेला क्रम मोडल्यास आणखी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्यानं आपण नेहमीप्रमाणेच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ, असं पुण्यातील प्रमुख मंडळांनी म्हटलंय.  मात्र कुठल्या गणेश मंडळाने विसर्जन मिरवणुकीत कधी सहभागी व्हायचं हे ठरवण्याची जबादारी पोलिसांची असते . त्यामुळं पोलिसांच्या भूमीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विसर्जन मिरवणुकीचे सगळे नियोजन पूर्ण झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय. 


मागील वर्षी काय परिस्थिती होती?


 मागीलवर्षी काही गणेश मंडळांनी अलका चौकात ठाण मांडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती . तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांना स्वतः रस्त्यावर उतरून विसर्जन मिरवणूक मार्गस्थ करावी लागली होती. या विलंबामुळं इतर मंडळांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं यावेळी विसर्जन मिरवणुक वेळेत पार पाडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे . 


पोलिसांची भूमिका महत्वाची?


हिंदू धर्मशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या आधी गणेशाचं विसर्जन होणं अपेक्षित असतं. मात्र गणेशोत्सवाच्या नऊ दिवसांत सगळे विधी आणि सोहळे यथासांग पार पडणारी अनेक मंडळ दहाव्या विसर्जनाच्या दिवशी मात्र उन्मादी अवस्थेला पोहचतात. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत गेली काही वर्ष अनेकदा तणावाचं वातावरण निर्माण होतं. ती टाळण्याची जबाबदारी या गणेश मंडळांची तर आहेच पण  सर्वात मोठं कर्तव्य पोलिसांचं आहे. पुणे पोलीस बोटचेपी भूमिका घेतात की नियमांवर बोट ठेवतात यावर पुण्यातील विसर्जन मिरवणूक कशी पार पडणार हे ठरणार आहे.


इतर महत्वाची बातमी-


Bhau Rangari Ganpati : इंग्रजांनाही न कळलेली जागा; पुण्यातील भाऊसाहेब रंगारी वाडा