Pune G-20 : जी-20 बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी (Pune G-20) आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली. शनिवार वाड्याची भव्यता पाहून पाहुणे अचंबित झाले. लाल महल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्सुकतेने जाणून घेतला. जिजाऊंचा इतिहासदेखील त्यांनी जाणून घेतला. त्यासोबतच प्रत्येक स्थळावर फोटोसेशनदेखील केलं.
सकाळी शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरुवात झाली. शनिवार वाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने त्यांनी मार्गदर्शकांना प्रश्नही विचारले. परिसरातील जुने वडाचे झाड पाहण्यासाठी आवर्जून काही क्षण त्यांनी त्याठिकाणी घालवले. नोंदवहीमध्ये शनिवार वाडा अत्यंत सुंदर, भव्य आणि आकर्षक असल्याची प्रतिक्रीया त्यांनी नोंदवली. अशा ऐतिहास स्थळांना भेट देण्याची संधी दिल्याबद्दल प्रतिनिधींनी प्रशासनाला धन्यवाद दिले.
लाल महल येथे पारंपरिक चौघड्याच्या सुरावटीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यामागचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला, तर काहींनी महालातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यालाही अभिवादन केले. महालातील फोटोही त्यांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये टिपले.
भेटीच्या अखेरच्या टप्प्यात प्रतिनिधींनी नाना वाडा येथे भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला. अजित आपटे आणि संदीप गोडबोले यांनी पाहुण्यांना पुण्याचा इतिहास आणि वारसा स्थळांबाबत माहिती दिली. यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाहुण्यांचे आभार मानले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, पर्यटन विभागाच्या सहाय्यक संचालक सुप्रिया करमरकर, वारसा स्थळ जतन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी उपस्थित होते.
आगाखान पॅलेसला भेट
तसेच जी-20 प्रतिनिधींनी आगाखान पॅलेसला ही भेट देऊन महात्मा गांधीजी यांच्या जीवनाविषयी माहिती घेतली. त्यांनी गांधीजींचे बालपण, कस्तुरबा गांधींचे जीवन, आगाखान पॅलेस येथील गांधीजींचे वास्तव्य याबाबत माहिती विचारली. नीलम महाजन यांनी त्यांना याबाबत तसेच पॅलेसचे ऐतिहासिक महत्व विषयी माहिती दिली. यावेळी पाहुण्यांनी चरख्याबाबतही माहिती जाणून घेतली.
प्रत्येक स्थळावर जय्यत स्वागत
या सगळ्या वारसा स्थळांच्या प्रत्येक रस्त्यावर रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्यासोबतच पारंपरिक वाद्य वाजवून त्यांचं स्वागतही करण्यात आलं. शनिवार वाडा, लाल महालासोबतच त्यांनी कसबा मंदिर, दगडूशेठ मंदिराचंदेखील दर्शन घेतलं.
हेही पाहा