Fire Brigade : अग्निशमन दलाच्या जवानांना देवदूत (Fire Brigade) म्हणून कायम संबोधलं जातं. पुण्यातील अग्निशमन दलातील जवान हर्षद येवले यांनी देखील कुटुंबियांना जत्रेला घेऊन जात असताना रस्त्यावर पेट घेत असलेली गाडी पाहिली आणि जीवाची तमा न बाळगता कुटुंबियांना सोबत घेत गाडीची आग विझवली. त्यांनी कुटुंबीय सोबत असताना आणि महत्त्वाचं म्हणजे सुट्टीवर असताना केलेल्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. 


पुण्यातील उंड्री परिसरात मंगळवारी (11 एप्रिल) रात्री एका चालत्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. त्यावेळी ऑफ-ड्युटी असलेला अग्निशमन दलाचा जवान मदतीसाठी आला. पेटलेली गाडी पाहून त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी केली. मग धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुन बीएमडब्ल्यु-एक्सवन या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे अग्निशमन वाहन पोहोचताच जवानांनी पाण्याचा मारा करत आग पूर्ण विझवली. अग्निशमन दलाचे कार्य पार पडताच उपस्थित नागरिकांनी आणि कुटुंबीय यांनी जवान हर्षद येवले आणि इतर जवानांचे ही कौतुक केले. या कामगिरीत देवदूत जवान हर्षद येवले तसेच कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक बाबुराव जाधव, अक्षय खरात व तांडेल सोपान कांबळे आणि जवान अभिजित थळकर, अर्जुन यादव, साहिल पडये, अनिल चव्हाण यांनी सहभाग घेतला.


अग्निशमन दलाचे जवान ठरले देवदूत!


पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी बजावली आहे. यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानाने जीवनदान दिले होते. राहत्या घरात तरुण आत्महत्येचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांनी लगेच अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिली होती. जवान तातडीने घटनास्थळी हजर झाले आणि घराचं दार फोडत तरुणाची सुटका केली. ही घटना पुण्यातील श्रद्धा अपार्टमेंट, वडगाव बुद्रुक सिंहगड रस्त्यावर रात्री अकराच्या सुमारास घडली होती. या घटनेत तरुणाला जीवनदान दिल्याने अग्निशमन दलाच्या जवानांचं सगळीकडे कौतुक करण्यात आलं होतं. घटनास्थळी पोहोचताच अधिकारी आणि जवानांनी लगेचच पोलिसांकडून माहिती घेत बचावकार्यास सुरुवात केली होती. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घरामध्ये तरुणाचा ओरडण्याचा आवाज येत होता. हा प्रकार घडत असताना जवानांनी मुख्य लाकडी दरवाजा आणि लोखंडी दरवाजा याला बोल्ड कटरने तोडून आत प्रवेश केला. स्वयंपाक घरामध्ये तरुण पंखा आणि गळ्यामधे नायलॉनची दोरी अडकवून एका लाकडी स्टुलवर उभा असलेला दिसला होता.