पुणे : पैशांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून पुरावा नष्ट करणाऱ्या प्रियकराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आंबेगाव पठार परिसरात 23 ऑगस्टला मध्यरात्री ही घटना घडली. मृत महिला (वय 35 वर्ष) आणि आरोपी (वय 27 वर्ष) तरुण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.


आरोपी तरुण हा मूळचा मुंबईतील जोगेश्वरीमधील होता. पुण्यातील एका आयुर्वेद कॉलेजमध्ये तो बीएएमएसच्या शेवटच्या वर्षात तो शिकत होता. मुंबईत असतानाच त्याचे देहविक्री करणाऱ्या महिलेशी सूत जुळले होते. शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर त्याने महिलेलाही सोबत आणलं आणि आंबेगाव पठार इथल्या सोसायटीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला.

तीन वर्ष ते एकत्र राहिले. पण त्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागले. महिलेला दिल्लीला जायचं होतं, त्यासाठी ती तरुणाकडे 50 लाख रुपयांची मागणी करत होती. पैसे न दिल्यास त्याच्या कुटुंबीयांना सांगण्याची धमकी ती तरुणाला देत होती. यावरुन दोघांचं सतत भांडण होत असे.

23 ऑगस्टलाही त्यांच्या पैशांवरुन वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, अमोलने गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर मध्यरात्री तीनच्या सुमारास बेडशीटच्या सहाय्याने तिचा मृतदेह सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेल्या टाकीत टाकला.

मात्र दुसऱ्या दिवशी सोसायटीतील नळांना पाणी न आल्याने रहिवाशांनी पाण्याच्या टाकीचं झाकण उघडून पाहिलं असता त्यांना एका महिलेचे पाय तरंगताना दिसले. त्यांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी चौकशी केली असता, तरुणी आरोपी तरुणासोबत राहत असल्याचं समोर आलं. तसंच त्यांच्यात आर्थिक कारणावरुन वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली.