पुणे : पुण्याजवळील चिंचवड गावात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी घडलेल्या या घटनेमध्ये कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला, तर पती आणि मुलाचा जीव थोडक्यात बचावला आहे.


अश्विनी पवार असं यात मृत्युमुखी पडलेल्या 60 वर्षीय महिलेचं नाव आहे. भागीदारांना कुठून पैसे द्यायचे असा प्रश्न पवार कुटुंबीयांना पडला होता. त्यामुळे आर्थिक संकट ओढवलेल्या पवार कुटुंबानं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

पवार कुटुंबीय आणि सुमित सक्सेना यांनी शुभम करौती फूड्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी 2013 साली स्थापन केली. सक्सेना यांचे 80 टक्के तर पवार कुटुंबियांचे 20 टक्के शेअर्स होते. भागीदारांना दाम दुपटीने पैसे देण्याचं आमिष दाखवत होते. एकूण साडे चार कोटींची गुंतवणूक झाली होती.

भागीदारांकडून पैशाची मागणी होऊ लागली होती. इतकंच नव्हे तर या प्रकरणी या सर्वांना सेबीने नोटीस देखील धाडली होती. त्यामुळे सुमित सक्सेना हा 27 सप्टेंबरपासून गायब झाला. तर काही दिवसांनी त्याने मोबाईल देखील बंद ठेवला आणि तेव्हापासून भागीदारांच्या समोर फक्त पवार कुटुंबीय आले.

शनिवारी तिघांनी हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  दरम्यान या प्रकरणी पोलिस अधिक तपास घेत असून पती सुधीर पवार आणि मुलगा रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.