पुणे : 25 लाखांची खंडणी मागूनही रश्मी शुक्ला यांच्या आशीर्वादामुळे सुशेगाद असलेल्या पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळचे नवनवे कारनामे उजेडात येऊ लागले आहेत. 2012 मध्ये धनंजय धुमाळनं एटीएसमध्ये असताना अजय चौधरी नावाच्या बिल्डरचाही पैशासाठी छळ केल्याचा आरोप आहे.


 
भांडारकर रस्त्यावर राहणाऱ्या चौधरींच्या घरावर अपरात्री छापा टाकून धुमाळनं तुमचे दाऊदशी संबंध आहेत, असा आरोप केला. तसंच शिवीगाळ करत पैशांची मागणी केली.  या सगळ्या प्रकाराविरोधात चौधरी यांनी न्यायालयात दाद मागितली.

 

 

त्यानंतर धुमाळवर गुन्हाही दाखल झाला होता. मात्र त्याची चौकशी झाली नाही. विशेष म्हणजे रविंद्र बऱ्हाटे यांनीही धुमाळनं आपल्याला पैशांसाठी धमकावल्याचा दावा केला आहे. एटीएसच्या कार्यालयात बोलावून धुमाळनं पैशांसाठी छळ केल्याचं बऱ्हाटेंचं म्हणणं आहे.

 

 

पुणे पोलीस आयुक्तांच्या नावे खंडणी; पोलीस निरीक्षकावर कारवाईऐवजी फक्त बदली



धनंजय धुमाळवर रश्मी शुक्लांनी दाखवलेल्या मेहरबानीचं कारणही तसंच आहे. संदीप जाधव आणि हेमंत गांधींनी 80 लाख रुपये स्टँप ड्युटी भरुन बाणेरमधील 15 गुंठे जमीन संजय मुथा यांच्याकडून विकत घेतली. खरंतर एटीएसचा आणि जमीन प्रकरणाचा संबंध नसतानाही रश्मी शुक्लांनी हे प्रकरण तपासासाठी धनंजय धुमाळकडे दिलं.

 
एटीएसमध्ये असलेल्या धुमाळकडे प्रकरण सोपवल्यानंतर अडचण येऊ नये म्हणून रश्मी शुक्लांनी धुमाळची बदलीही प्रॉपर्टी सेलला केली आणि त्यानंतर मॅडमना 25 लाख रुपये द्यावे लागतील असं सांगून धुमाळ धमकावत राहिला. आता याच मेहरबानीमुळं रश्मी शुक्लांनी धनंजय धुमाळला वाचवण्याचा प्रयत्न सुरु केला नाही ना? अशी चर्चा रंगू लागली आहे.