Dattatray Ware Guruji News: महाराष्ट्रात काय सुरु आहे असा प्रश्न कुणालाही विचारला तर प्रत्येक जण एकच उत्तर देईल.. ते म्हणजे राजकारण.. सध्या खातेवाटप, विस्तार, नाराजी, बैठका, दिल्लीवारी याच चर्चा प्रत्येकाच्या तोंडी आहेत. सोशल मीडियाच्या व्हिडीओमध्येही हेच शब्द ट्रेंडिंगमध्ये आहेत. एकीकडे अशी सगळी स्थिती असताना दुसरीकडे एकमेकांवर राजकीय चिखलफेकही जोरात सुरु आहे. राजकीय वातावरण इतकं गढूळ झालेलं असतानाच काही लोक मात्र ध्यानस्थ वृत्तीनं आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतायत. पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी गावातील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे हे त्यापैकीच एक. 


चारही बाजूंना पसरलेलं माळरान आणि मधोमध असलेली ही शाळा. वाईटातून काहीतरी चांगलं होतं असं म्हटलं जातं. या सुंदर शाळेची उभारणी अशा वाईट प्रसंगातूनच झालीय. वाबळेवाडीची सुंदर शाळा उभारणाऱ्या वारे गुरुजींवर गावच्या राजकारणातून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. जिल्हा परिषदेतून त्यांचं निलंबन घडवून आणण्यात आलं. मात्र वारे गुरुजींवरील आरोपांमध्ये तथ्य नसल्यानं जिल्हा परिषदेला निलंबन मागे घ्यावं लागलं. 


गुरुजींची आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बदली करण्यात आली. दोन गळक्या खोल्या, अवघे सात ते आठ विद्यार्थी... वारे गुरुजी मागील वर्षी जेव्हा इथं आले तेव्हा जालिंदर नगरच्या या शाळेची ही अशी अवस्था होती. वारे गुरुजींनी गावकऱ्यांना साद घातली. जालिंदर नगरचे गावकरी सरसावले, काही दानशूर उद्योजक पुढे आले आणि जालिंदर नगरच्या या शाळेचा कायापालट झाला. वाबळेवाडीसारखीच सुंदर आणि चकचकीत शाळा उभी राहिली आणि विद्यार्थ्यांची संख्या आठवरून थेट शंभरच्या पुढं गेली. 


पण ही शाळा नुसती चकचकीत नाही तर अभिनव देखील आहे. या शाळेत न खोली आहे न बेंच आहेत, न फळा आहे न वह्या पुस्तकं. सगळं काही हसत - खेळत शिकवायचं असा वारे गुरुजींचा आग्रह. 


चौथीच्या पुढं इयत्ता वाढवून मिळाव्यात यासाठी वारे गुरुजींचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. निदान यावेळी तरी राजकारण्यांनी अडथळे घालू नयेत म्हणजे मिळवलं. 


एकीकडे सरकार, सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून सातत्याने बोलत असते. अशा वेळी जिल्हा परिषदेची शाळेला जर चांगला शिक्षक मिळाला तर ती किती प्रभावी होऊ शकते, खाजगी शाळेलाही मागे टाकत आंतरराष्ट्रीय दर्जा निर्माण करू शकते हे वारे गुरूजींनी एकदा नव्हे तर दोनदा दाखवून दिलं आहे.  


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI