पुणे: भारतीय लष्करात भरती करून देण्याचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका बोगस कर्मचाऱ्याला लष्कर गुप्तचर आणि बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. नितीन बालाजी सूर्यवंशी असे या आरोपीचे नाव असून, तो लातूरचा रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन सूर्यवंशी काही काळ लष्कराच्या कॅन्टीनमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत होता. याच ओळखीचा फायदा घेत त्याने अनेक तरुणांची फसवणूक केली. फिर्यादी तरुण हा लष्कर भरतीसाठी पुण्यात वास्तव्यास होता. उदगीर रेल्वे स्थानकावर सूर्यवंशीची त्याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्याने फिर्यादीला सदर्न कमांड कॅन्टीन आणि सब एरिया कॅन्टीनमध्ये बोलावले. विश्वास संपादन करण्यासाठी सूर्यवंशीने लष्कराच्या गणवेशात भेट घेतली.


लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक


सुर्यवंशीने एका महिन्यात लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन लाख रुपयांची मागणी केली. त्याच्या गणवेशावर विश्वास ठेवून फिर्यादीने 1 लाख 75 हजार रुपये रोख आणि ऑनलाइन स्वरूपात पाठविले. मात्र, त्यानंतर सूर्यवंशी टाळाटाळ करू लागला. अनेक वेळा संपर्क साधूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तेव्हा फसवणुकीचा संशय बळावला आणि फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.


आणखी तरुणांची फसवणूक उघड


पोलिस तपासात सूर्यवंशीने अनेक तरुणांकडून अशाच प्रकारे लाखो रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. काही तरुणांना ३ लाख रुपये घेतल्यानंतरही लष्करात भरती न करता फसवले गेले आहे. गणवेशावर विश्वास ठेवून फिर्यादीने 1 लाख 75 हजार रुपये रोख आणि ऑनलाइन स्वरूपात पाठविले. मात्र, त्यानंतर सूर्यवंशी टाळाटाळ करू लागला. यानंतर अनेक वेळा फिर्यादी यांनी सूर्यवंशीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेतली.


तरुणांनी सावध राहण्याची गरज


भारतीय लष्करात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांनी अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणत्याही नोकरीसाठी अधिकृत भरती प्रक्रियेशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.