Pune Crime news : पुण्यात महिला पोलिसांला (Pune) (Crime news) मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अश्लील शिवीगाळ करुन महिला पोलिसाला चपलेने मारहाण करण्यात आली आहे. माझी गाडी का उचलली, याचा जाब विचारत त्या महिला पोलिसाला जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेला अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी महिला पोलिसाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महिलेला अटक करण्यात आली आहे. सीता रमेश पुजारी (वय 35 वर्षे, रा. ताडीवाला रोड) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. वाहतूक पोलिसांनी एका महिलेची गाडी उचलली होती. अलका टॉकिज परिसरात हा प्रकार घडला आहे. माझी गाडी का उचलली असा जाब त्या महिलेने पोलीस महिलेला विचारला होता. त्यावेळी पोलीस महिलेने माझी पोस्टिंग या परिसरात नाही त्यामुळे मला याबाबत माहिती नाही," असं उत्तर दिलं होतं. 


"मी या विभागाची नसून तुम्ही शेजारील ट्रॅफिक ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा," असंही सांगितलं. त्यावर तिने तू पोलीस खात्यात असून तुला माहित नाही का?,अशा एकेरी भाषेत विचारणा केली. त्यानंतर तिने तिच्या पायातील चप्पल काढून हातात घेऊन पोलिसाच्या पायावर, छातीवर मारहाण केली. या झटापटीमध्ये फिर्यादीच्या गणवेशाच्या पॅन्टचे बटण तोडले. त्यांचे लाईनयार्ड बाहेर ओढले. केस ओढून त्यांना तिने अश्लील शिवीगाळ देखील केली. सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे त्या महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आणि अटक करण्यात आली आहे. 


पोलिसांना होणाऱ्या मारहाणीत वाढ
काही दिवसांपूर्वी पुणे शहरात पोलिसांना मारहाणीच्या दोन दिवसातील तीन घटना समोर आल्या होत्या. पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करुन आणि ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदाराला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. 34 वर्षीय रामा कुंडलिक शिंदे असे या व्यक्तीचे नाव होतं. त्याबरोबरच पुण्यातील धानोरीत भर रस्त्यात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. चार-पाच जणांमध्ये गाडी काढण्यावरुन पोलिसांशी वाद होता. वाद शिगेला पोहचल्यानंतर हाणामारी झाल्याची घटना घडली होती. या मारहाणीत पोलीस कर्मचारी यांना गंभीर दुखापत झाली होती. 


धाक नेमका कुणाचा?
मागील काही महिन्यापासून राज्यभरात पोलिसांच्या मारहाणीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांना असं मारहाण करत, कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का? किंवा तरुणांना धाक नेमका कुणाचा असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.