पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चर्चेत असतानात आता पुण्यातच सासरच्या छळाला कंटाळून आणखी एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. स्नेहा विशाल झेंडगे असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहत्या घरी स्नेहा हिने आत्महत्या (Pune Crime News) केली. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या लोकांविरोधात स्नेहाच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी कैलास मच्छिंद्र सावंत यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
वीस लाख रुपये घेऊन यावे...
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहा यांचे विशाल झंडगे यांच्याशी गेल्या वर्षी लग्न झालं (Pune Crime News) होतं. हे दोघेही पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहायला होते. लग्न झाल्यानंतर स्नेहा आणि तिच्या सासरच्या मंडळींमध्ये अनेक वेळा वाद होत होते. फिर्यादी यांनी दिलेल्या पोलिसांना फिर्यादीनुसार, स्नेहा हिला स्वयंपाक नीट करता येत नाही, तिने वीस लाख रुपये घेऊन यावे, तसेच इतर कारणासाठी स्नेहाचा सासरच्या मंडळींकडून अनेक वेळा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. तसेच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे तिने आत्महत्या केली असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे.
वर्षभरात विवाहीतेने जीवनाचा असा शेवट केल्यानं हळहळ
यावरून स्नेहाचा पती विशाल झंडगे, सासरे संजय झंडगे, सासु विठाबाई झंडगे, दीर विनायक झंडगे, नणंद तेजश्री थिटे, नंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्याचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे, तर वर्षभरात विवाहीतेने जीवनाचा असा शेवट केल्यानं हळहळ व्यक्त होत आहे, तर तिच्या सासरच्या मंडळींविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.