पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात अत्याचाराच्या (Pune Crime News) घटना मोठ्या प्रमाणावरती समोर येत आहेत. अशातच पिंपरीमध्ये एका 17 वर्षांच्या मुलीवर अत्याचार घडल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मिडियाच्या (Social Media) माध्यमातून ओळख झाली, पाच वर्षांपासून ओळख होती, मात्र, पहिल्यांदा त्यांची भेट झाली त्यानंतर ही संपूर्ण घडली असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्यांदा भेटल्यानंतर ‘ट्रुथ अँड डेअर’ गेम खेळताना या अल्पवयीन (Pune Crime News) मुलीशी जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार रावेत येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी आयुष आनंद भोईटे (वय 20 , रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), सुशील बालन्द्र ठाकूर (वय 22, रा. बापदेवनगर, देहूरोड), रितिक संजय सिंग (वय 25, रा. बापदेवनगर, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.


नेमकं काय घडलं?


रावेत परिसरामध्ये एका 17 वर्षीय युवतीवर 28 वर्षीय तरुणाने घरातील बाथरूममध्ये अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी, तिची मैत्रीण आणि आरोपी हे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यावर पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे भेटले होते. त्यांनी भेटल्यानंतर मद्यप्राशन केलं, त्यानंतर मंगळवारी (दि. 21) मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी आयुष आनंद भोईटे (20 रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), सुशील बालन्द्र ठाकूर (22 रा. बापदेवनगर, देहूरोड), रितिक संजय सिंग (25, रा. बापदेवनगर, देहूरोड) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. आयुष आनंद भोईटे या नराधमाने सतरा वर्षीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे.


सतरा वर्षीय पीडित मुलगी ही मूळची राजगुरूनगर येथील आहे, ती नीट (एनईईटी) परीक्षेची तयारी करण्यासाठी पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात भाडेतत्त्वावर राहते. पाच वर्षांपूर्वी तिची कोंढव्यातील एका रीलस्टार मुलीशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर रील स्टार मुलगी पीडित मुलीच्या खोलीवर एक दिवस राहण्यासाठी आली होती. काही वेळाने मी मित्राकडे जाऊन येते, असे सांगून रावेतला मित्र भोईटे याच्याकडे गेली होती. भोईटे आणि तिने मद्य प्राशन केले. त्यानंतर मध्यरात्री भोईटे याचे दोन मित्र पीडित मुलीलाही रावेत येथे घेऊन गेले.


रावेतला गेल्यानंतर अल्पवयीन पीडित, रील स्टार आणि इतर आरोपींनी पुन्हा मद्य प्राशन केलं. त्यानंतर त्यांनी ‘ट्रुथ अँड डेअर’ गेम खेळायला सुरुवात केली. त्यावेळी आरोपी भोईटेने प्रथम ‘रिल स्टार’बरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने त्याने पीडित मुलीवर अत्याचार केला. 


 घटना कशी आली समोर?


‘ट्रुथ अँड डेअर’ गेम खेळत असताना आरोपी भोईटेने पहिल्यांदा रीलस्टारबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने त्याने पीडित अल्पवयीन मुलीला फ्लॅटमधील स्वच्छतागृहात घेऊन जाऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडत असताना पीडितेच्या मोबाईलवरून तिच्या एका नातेवाईकाला फोन लागला होता. फोन सुरू होता तेव्हा पीडितेला आणि आरोपीला लक्षात आलं नाही. संबंधित नातेवाईकाने हा प्रकार लक्षात येताच तातडीने पीडित मुलीच्या आई-वडिलांना कळवला. नातेवाईकाने धक्कादायक माहिती दिल्यावरती पहाटेच्या सुमारास पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पिंपरी- चिंचवडमध्ये धाव घेतली. पिडितेकडून सर्व प्रकार जाणून घेतला त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार केली, पोलिसांनी तातडीने आरोपींना ताब्यात घेतलं आहे. 


पीडितेच्या रीलस्टार मैत्रिणीला ही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीला आरोपींची नावे आणि अत्याचार झालेले ठिकाण याबाबत काहीच कल्पना नव्हती, घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी मोबाईल आणि तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर रावेत पोलिसांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे , याबाबतचा अधिक तपास रावेत पोलिस करत आहेत.