Pune crime news: पुण्यातील खराडी परिसरात शनिवारी रात्री एका फ्लॅटवर सुरु असलेली रेव्ह पार्टी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळली. यावेळी पोलिसांकडून पाच पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली. यामध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांचाही समावेश असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या रेव्ह पार्टीत कोकेन आणि गांजा या अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर पुणे पोलिसांनी आपला मोर्चा शरद पवार गटाच्या नेत्या आणि प्रांजल खेवलकर यांचे पती रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या घराकडे वळवला आहे.
पुणे पोलिसांकडून काहीवेळापूर्वीच रोहिणी खडसे यांच्या हडपसर येथील बंगल्यावर छापा टाकण्यात आला. याठिकाणी गेल्या काही वेळापासून पोलिसांकडून झाडाझडती सुरु आहे. पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोहिणी खडसे यांच्या घराची झाडाझडती घेतली जात आहे. दरम्यान, रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडल्यानंतर पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले होते. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर प्रांजल खेवलकर यांना हडपसर येथील त्यांच्या बंगल्यावर आणण्यात आले आहे. याठिकाणी आता पोलिसांना अंमली पदार्थांचा साठा सापडणार का, हे बघावे लागेल. तसे घडल्यास एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांना काहीवेळापूर्वीच या बंगल्यातून पुन्हा पोलीस ठाण्यात नेले आहे. यावेळी पोलिसांनी काही गोष्टी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र, या गोष्टी नेमक्या काय होत्या, हे अद्याप कळू शकलेले नाही.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्याकडून भाजपचे ताकदवान नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. एकनाथ खडसे यांच्याकडून वारंवार सीडी बाहेर काढण्याची भाषा सुरु होती. या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचा जावई पकडला जाणे, हा निव्वळ योगायोग आहे की यामागे राजकीय कनेक्शन आहे, याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे.
आणखी वाचा
पोलिसांना ऑनलाईन हाऊस पार्टीची टीप मिळाली, पुण्यातील फ्लॅटवर धाड टाकताच समोर काय दिसलं?
मोठी बातमी: एकनाथ खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला; तीन महिला आणि मित्रासह नशेत धुंद
पुण्यातील रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळली, एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, पाहा PHOTOS