Pune Crime News : "ऑनलाईन रेटिंग द्या अन् पैसे मिळवा." घरबसल्या लाखो (Pune Crime News) रुपये कमविण्याच्या हा ऑनलाईन टास्क आहे. या टास्कचा मेसेज तुमच्या हातातल्या मोबाईलवर नक्कीच आला असेल. आता तुम्ही या टास्कचे बळी ठरला नसाल तर ते तुमचं नशीब आहे. पण जे या टास्कच्या मोहात अडकलेत त्यांना मात्र कोट्यवधींचा चुना लागला आहे. असे एक दोन नव्हे तर देशातील तीन कोटी उच्च शिक्षित या जाळ्यात फ़सलेत आणि त्यांना या टोळीनं तब्बल दोनशे कोटींचा गंडा घातला आहे. काय आहे हा प्रकार आणुि ही टोळी त्यांच्या सापळ्यात तुम्हाला कसं अडकवू शकते? पाहुयात...
पुण्याच्या हिंजवडीतील नामांकित कंपनीत कार्यरत असणारा आयटी अभियंता प्रशांत टाले. प्रशांत लाखो रुपयांचा पगार घेतो, अशात ऑगस्ट महिन्यात त्याच्या मोबाईलवर त्याला एक ऑनलाईन टास्क आला. रेटिंग द्या आणि पैसे मिळवा. हे वाचून, घरबसल्या वरचा खर्च निघेल, या आशेने प्रशांत या टास्कच्या मोहात पडला आणि त्याला लाखो रुपयांना गंडा बसला.
घरबसल्या ऑनलाईन रेटिंग दया आणि पैसे मिळवा, या टास्कच्या मोहात प्रशांत पडला. या टास्कमध्ये रेटिंग देताच प्रशांतला काही मिनिटांमध्येच त्याचा मोबदला ही मिळू लागला. प्रशांतचा वाढलेला हा मोह पाहता, त्यांनी टास्कमध्ये बदल केला. आता बदलेल्या टास्कनुसार, आधी तुम्ही पैशांची गुंतवणूक करायची मग त्याबदल्यात तुम्हाला अधिकचा पैसा मिळेल, असं प्रशांतला आमिष दाखवण्यात आलं. त्याला बळी पडत प्रशांत एकामागोमागएक टास्क सोडवत गेला. तसतसे त्यांच्या ऑनलाईन खात्यात लाखो रुपये जमा झाल्याचं ही दिसू लागलं, पण प्रत्यक्षात पैसे काढायची वेळ आली. तेंव्हा प्रशांतचे डोळे उघडले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
या भामट्यांच्या जाळ्यात अडकलेला प्रशांत एकटाच नाही, तर या टोळीनं देशभरातील तीन कोटी उच्च शिक्षितांकडून तब्बल दोनशे कोटी हडपलेत. ऑनलाईन टास्कद्वारे गंडा घालणारी टोळी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी मोठी शक्कल ही लढवली होती. सध्या सायबर भामट्यांचा धुमाकूळ सुरु असल्याचं या घटनांमधून दिसून येतं.
'ऑनलाईन टास्क"साठी तीन टप्पे
'ऑनलाईन टास्क"च्या जाळ्यात अडकवण्यासाठी या भामट्यांनी तीन टप्पे पडले होते. पहिला टप्पा म्हणजे गोरगरिबांच्या नावाने बँकेत खाती खोलायची आणि ती खाती विकत घ्यायची. दुसरा टप्पा म्हणजे या खात्यांवरून टास्क सोडवणाऱ्यांना पैश्यांची देवाण-घेवाण व्हायची तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे त्या खात्यांवरील रक्कम गायब केली जायची.
...अखेर टोळीचा पर्दाफाश!
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिताफीनं तपास करत या टोळीचा पर्दाफाश केलाय. आत्तापर्यंत चौदा आरोपींना बेड्या ठोकल्यात. 95 बनावट बँक खाती ही सील केली. हाँगकाँग व्हाया दुबईपर्यंत तपासाची लिंक ही पोहचली आहे. पण हडप झालेले दोनशे कोटी प्रशांत टालेसह त्या तीन कोटी तक्रारदारांना परत भेटतील का? याबाबत शंका आहे. त्यामुळं तुमच्यावर ही वेळ येऊ द्यायची नसेल तर आपल्या हातातील मोबाईलमध्ये येणाऱ्या लिंकवर क्लिक करताना, हजारदा नक्की विचार करा.
इतर महत्वाची बातमी-