Pune Crime News: सिंहगड रोडवरील नांदेड सिटीतील स्पा सेंटरवर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला आहे. यात वेश्या व्यवसाय करणा-या एक परदेशी व दोन स्थानिक तरुणींची सुटका केली. सेंटर मॉलमधील ब्लु बेरी स्पा मसाज असं या स्पा सेंटरचं नाव आहे. या प्रकरणी चार जणांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मसाज सेंटरचे मालक मुंजा रामदास शिंदे (वय 31 रा.वडगाव ता.हवेली जि.पुणे), व्यवस्थापक योगेश पवार (रा.नांदेड गाव ता.हवेली जि.पुणे ), अथर्व प्रशांत उभे (वय 19 रा.धायरी, बेनकरवस्ती ता.हवेली जि.पुणे) व महिला व्यवस्थापक ज्योती विपुल वाळींबे (वय ३० रा.न-हे, ता.हवेली जि.पुणे) या चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
ब्लु बेरी स्पा मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली हा अनुचित प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार बनावट गिऱ्हाईक पाठवून या सगळ्या प्रकाराची पोलिसांनी खात्री करुन घेतली. त्याच सेंटरमध्ये अधिकच्या सेवेच्या नावाखाली हा व्यावसाय सुरु आहे, अशी पोलिसांना खात्री पटली. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून दुपारच्या सुमारास छापा टाकला. यात मालक, दोन व्यवस्थापक आणि दोन पिडीत तरुणी सापडल्या. यात प्रकरणी सापडलेल्या 3 पिडीत तरुणींना महिला सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे आणि मालक व्यवस्थापक यांना अटक करण्यात आली आहे.
छाप्यांच्या प्रमाणात वाढ
स्पा सेंटरच्या छाप्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनुचित प्रकार आढळल्यास पोलीस सापळा रचून थेट कारवाई करत आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक अशा अवैध कारभारांना वचक बसताना दिसतो आहे. अशा प्रकारच्या कारवाई करण्यासाठी अनेकदा आम्ही पुढाकार घेतो. त्यामुळे महिन्यात किमान 2 अशा स्पा सेंटरवर छापा मारण्याच्या तयारीत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
विमान नगरमध्येही घडला होता असा प्रकार
पुण्यातील अनेक स्पा सेंटरवर अशा प्रकारचा अवैध वेश्या व्यवसाय सुरु असतो. त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यापुर्वी पुण्यातील विमाननगर भागात मसाज सेंटरच्या नावाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला होता. या कारवाईत मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली होती. वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली होती. 'जस्ट डायल'वर विमाननगर परिसरातील मसाज पार्लरबाबत माहिती उपलब्ध होती.स्पा सेंटरमधील कामगारांकडून संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला जात होता. त्यानंतर त्याला ग्राहक बनवून मसाजच्या नावाखाली जास्तीचे पैसे उकळल्या जात होते. जास्त पैसे उकळून वेश्याव्यवसाय केला जात होता, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आली आहे.