पुणे : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत(Pune Crime News) धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. चक्क ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांच्या फोटोला काळी, बाहुली, लिंबू टाचण्या टोचून जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोण्याचा वापर केल्याने याबाबत चिड व्यक्त केली जात आहे.
नारायणगावच्या ग्रामपंचायत निवडणूक सध्या सुरू आहे. उद्या या ठिकाणी मतदान होणार आहे. वार्ड क्रमांक चारमधील मुक्ताई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या फोटोला अशाप्रकारे काळी बाहुली लिंबू आणि टाचण्या टोचल्याचा अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये उमेदवारांकडून तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याबाबत काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.
पुणे जिल्ह्यातील 288 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. यात नारायणगाव ग्रामपंचायतीत 17 जागा आहेत. एकूण सहा प्रभागातून 35 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्याचप्रमाणे सरपंच पदासाठी पाच उमेदवार होते. त्यापैकी तिघांनी माघार घेतली. आता त्यामुळे दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. नारायणागावमधील निवडणुकीत श्री मुक्ताई हनुमान ग्रामविकास पॅनलकडून श्री मुक्ताई-हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलला टक्कर दिली जाणार आहे. सरपंच पदासाठीही हे दोन्ही पॅनलमध्येच लढत होत आहे. त्यामुळेच हा प्रकार केला असावा, असं बोललं जात आहे.
जादूटोण्याबाबत तक्रार करण्याचं आवाहन
परिसरात नरबळी, अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणाच्या घटना घडल्यास किंवा निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जादूटोण्याच्या दोन घटना समोर आल्या होत्या. त्या घटनेमुळे पुण्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायतीसाठी लढत?
-भोर – 46ग्रामपंचायती
-खेड - 46ग्रामपंचायती
-आंबेगाव – 44 ग्रामपंचायती
-जुन्नर – 41 ग्रामपंचायती
-बारामती - 32 ग्रामपंचायती
-दौंड – 16 ग्रामपंचायती
-शिरूर – 16 ग्रामपंचायती
-इंदापूर - 14 ग्रामपंचायती
-हवेली – 14 ग्रामपंचायती
-वेल्हे – 31 ग्रामपंचायती
-मावळ – ३१ ग्रामपंचायती
-पुरंदर – 22 ग्रामपंचायती
-मुळशी – 37 ग्रामपंचायती
इतर महत्वाची बातमी-
राज्यात उद्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी मतदान