पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या वाहनांच्या (Horn) संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वायुप्रदुषण आणि ध्वनीप्रदुषाणातदेखील वाढ झाली आहे. दररोज लाखो वाहनांच्या हॉर्नमुळे गोंगाट निर्माण होऊन ध्वनीप्रदुषणदेखील मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Traffic Police) अनोखी शक्कल लढविली आहे. पिंपरी-चिंचवडमध्य़े दर सोमवारी आता नो हॉर्न डे उपक्रम साजरा करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत सोमवारी कोणत्याही वाहनचालकाने हॉर्न वाजवू नये, यासाठी वाहतूक पोलीस शाळा, कॉलेज, आय टी इंडस्ट्री, एमआयडीसीमध्ये जाऊन नो हॉर्न डे संदर्भात जनजागृती करणार आहेत. वाहतूक पोलिसांकडून हा उपक्रम राबवला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यातील काही परिसरात तर कायम वाहतूक कोंडी असते. वाहतचूक कोंडी झाल्याने अनेकजण मोठ मोठ्याने हॉर्न वाजवतात. त्यामुळे अनेक नागरिकांना आणि त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाश्यांना त्रास होतो. या ध्वनिप्रदूषणामुळे अनेकांना कान तसेच मानसिक विकार झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, सामाजिक संस्था तसेच वाहतूक संस्थांकडून वारंवार जनजागृती करण्यात आली आहे. मात्र वाहनचालक याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होणाऱ्या अनेक ठिकाणी सातत्याने ध्वनिप्रदूषण होताना दिसते. यावर उपाय म्हणून प्राथमिक स्वरूपात दर सोमवारी वाहनचालकांनी नो हॉर्न डे पाळावा, असा निर्णय शहर वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
ध्वनिप्रदूषणाचे तोटे
-ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य या दोघांवर परिणाम होतो.
-ध्वनिप्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढतो, मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो.
-त्याला झोप लागत नाही म्हणून त्याचे मानसिक संतुलन बिघडते.
- ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व हृदयरोगाला आमंत्रण मिळते.
-ध्वनिप्रदूषणामुळे हळूहळू बहिरेपणा येतो.
-हृदयरोग असलेली व्यक्ती मोठमोठ्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते.
-गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही ध्वनिप्रदूषणामुळे हानी पोहचू शकते.
नागरिकांना आवाहन...
यापूर्वीही पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नो हॉर्न डे साजरा करण्यात आला होता. मात्र हा उपक्रम एका दिवसापूरताच मर्यादित असायचा. एकाच दिवसात हा उपक्रम राबवून ध्वनीप्रदुषण होणं शक्य नाही. त्यामुळे दर सोमवारी आता पिंपरी-चिंचवडमध्ये नो हॉर्न डे साजरा होणार आहे. नागरीकांनी या नो हॉर्न डे ला प्रतिसाद द्यावा, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
इतर महत्वाची बातमी-