पुणे: मागील काही दिवसांमध्ये पुण्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. खून, दरोडा, बलात्कार यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहे, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली आहे, असं असतानाच पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात सराईत गुन्हेगाराने भर रस्त्यात एका आयटी अभियंता तरुणीची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना, स्वारगेट परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, या प्रकारानंतर पुण्यात पोलिसांचा (Pune Police) धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तर आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कृष्णा बाबूराव सावंत (वय 25, रा. वांजरखेडा, ता. निलंगा, जि. लातूर) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचं नाव आहे. या धक्कादायक प्रकाराबाबत 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली होती.


नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची कोल्हापूरची असून, सध्या ती कोंढवा परिसरात राहते. ती आपल्या मैत्रिणीसह लष्कर भागात खरेदीसाठी गेली होती. याचवेळी स्वारगेट परिसरात बस थांब्याजवळ पिडित तरूणी थांबलेली असताना आरोपीने तरुणीची छेड (Pune Crime) काढली. तरूणीने आरोपीला विरोध केल्यानंतर त्याने तरुणीला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. 


आरोपीवर यापुर्वी खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा बाबूराव सावंत याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मारामारी केल्याप्रकरणी (Pune Crime) खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपूर्वीच आरोपी जामिनावर बाहेर आला आहे. पीडित तरुणी मूळची कोल्हापूरची असून, सध्या कोंढवा परिसरात राहते. ती मैत्रिणीसह लष्कर भागात खरेदीसाठी गेली असताना ही घटना घडली आहे. 


पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहेत गुन्हे


मागील काही दिवसांपासून पुण्यात हत्या, खुन, बलात्कार, छेडछाड, कोयता हल्ले, हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवणे यासारखे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. दोन दिवसांपुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नरसेवकाची हत्या करण्यात आली, याआधी पाटील इस्टेट भागात एका खोलीच्या वादातून एका महिलेची निर्घृण हत्या (Pune Crime) करण्यात आली आहे, त्याचबरोबर शाळा, रिक्षा, स्कूल व्हॅनमध्ये देखील छेडछेडीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत, यामुळे पालकांमध्येही संताप व्यक्त होत आहे.