Pune Crime News: घरातून पळून गेलेली अल्पवयीन मुलगी अखेर तीन महिन्यांनंतर सापडली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक पोलिसांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 22 एप्रिल रोजी अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबीयांनी सिंहगड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.


नक्की काय आहे प्रकरण?


22 एप्रिल रोजी काही कारणावरुन नांदेड फाटा परिसरातील मुलगी घरातून निघून गेली होती. मुलगी मिळत नसल्याने पालकांनी पोलीसांकडे धाव घेतली. पोलीस आणि सोशल मीडियावर तिचा शोध सुरु होता. सोशल मीडियावर तिची माहिती व्हायरल केली. त्यांनंतर अनेक ठिकाणाहून तिचा शोध सुरु होता. पुण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्ये देखील या मुलीच्या शोध मोहितमेत सहभागी झाले होते.  कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्ते शिवा पासलकर यांची भेट घेऊन मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली. त्यांच्यासोबतच  वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लाड हे मुलीचा शोध घेत होते. 


पासलकर यांनी पोलिसांना मुलीची सोशल मीडियावर माहिती घेण्यास सांगितलं. ती कोणाला आढळल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आले. जवळपास तीन महिन्यांपासून मुलीचे कुटुंबीय सिंहगड पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते शिवा पासलकर यांच्यासह तिचा शोध घेत होते.  ती कुठेच सापडत नसल्याने नातेवाइकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. दरम्यान 21 जुलै रोजी घाट परिसरात अल्पवयीन मुलगी सापडल्याचा फोन कुटुंबीयांना आला. तिला आळंदी महिला आश्रमात ठेवण्यात आले होते. तिची माहिती मिळताच पासलकर यांनी कुटुंबीयांसह आळंदी येथे धाव घेऊन कायदेशीर काम पूर्ण करून तिला ताब्यात घेतलं. 


सोशल मीडियाचा असाही उपयोग


सध्या सगळीकडे कोणताही गुन्हा घडला की आपण सर्रास सोशल मीडियाला दोष देतो. मात्र सोशल मीडिया अनेकदा पोलिसांचं काम हलकं करण्याचं काम करतात याचा प्रत्यय पुण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमुळे मुलगी सापडल्याने मुलीच्या नातेवाईकांनी आनंद व्यक्त केला आहे.