Pune Crime : विवाहितेच्या पोटात लाथ मारल्यामुळे तिचा गर्भपात (Miscarriage) झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील (Pune) वाघोली (Wagholi) परिसरात घडली आहे. या प्रकरणी विवाहितेने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राहुल मुकेश पवार (वय 21 वर्षे) आणि करण मुकेश पवार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.


महिलेच्या आईला शिवीगाळ आणि धमकी


मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार विवाहिता आणि आरोपी हे वाघोली परिसरातील विटाळकर चाळीत राहतात आणि ते एकमेकांचे शेजारी आहेत. 26 मे रोजी गर्भवती महिला तिच्या आईसोबत घराजवळच फेऱ्या मारत होती. यावेळी आरोपी राहुल पवारने गर्भवती महिलेच्या आईला शिवीगाळ केली. तसंच तुझी मुलगी कधीच सुखी वैवाहिक जीवन जगू शकणार नाही, अशी धमकीही दिली. 


आधी दगड मारला मग लाथ मारली


यावरुन भांडण अधिकच वाढलं. यानंतर आरोपी राहुल पवार आणि करण पवार या दोघांनी गर्भवती आणि तिच्या आईला दगड फेकून मारला. शिवाय राहुल पवार याने महिलेच्या पोटात लाथ मारली. यानंतर गर्भवती महिला वेदनेने विव्हळत खाली कोसळली. रक्तस्राव झाल्याने तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे पोहोचल्यानंतर या महिलेचा गर्भपात झाल्याचं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं. तर या प्रकरानंतर आरोपी राहुल पवार आणि करण पवार तिथून पळून गेले. 


दोन्ही आरोपींना बेड्या


महिलेच्या तक्रारीनंतर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांना राहुल पवार आणि करण पवार या दोन आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे.


वाघोलीत प्रेयसीकडून प्रियकराची हत्या


काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यातील वाघोलीत प्रेम प्रकरणातून प्रेयसीने प्रियकराची चाकूने वार करत हत्या केली होती. गेल्या एक वर्षांपासून यशवंत आणि अनुजा हे एकमेकांना ओळख होते. मात्र यशवंत हा तिला सारखा त्रास देत होता. तिच्यावर संशय घेत होता. यावरुन दोघांची भांडणं झाली आणि प्रेयसीने प्रियकरावर भाजी कापण्याच्या चाकूने वार करुन हत्या केली  होती, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी या हत्या करणाऱ्या प्रेयसीला अटक केली आहे. यशवंत महेश मुंडे (वय 22 वर्षे) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर अनुजा महेश पनाळे असं 21 वर्षीय प्रेयसीचं नाव आहे. 


हेही वाचा


Pune Crime News :  प्रेयसीने प्रियकराची हत्या का केली? वाघोलीतील हत्येचा धक्कादायक उलगडा