पुणे: पुण्यात नामांकित व्यावसायिकला तब्बल 4 कोटी रुपयांचा गंडा घालणारी रिलस्टार गुढीया उर्फ सानिया सिद्धकीला पुणे पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन अटक केली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात फेब्रुवारीमध्ये अटक केलेली सानिया पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेली होती. एका बाजूला सोशल मीडियावर रिल बनवणारी ही सानिया सायबर चोर आहे. बिहारच्या राहणारी सानियाने अनेक लोकांना सायबर चोरीचा सापळा रचून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील एका नामांकित बिल्डरला सुद्धा चार कोटी रुपयांचा गंडा घातला होता, त्यावेळी पुणे पोलिसांनी तिला परराज्यातून पकडले होते. मात्र, रेल्वेच्या प्रवासादरम्यान ती पोलिसांच्या तावडीतून पळून गेली. या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या 6 जणांना निलंबित करण्यात आलं होतं. 10 महिन्यांपासून पुणे पोलिसांच्या सायबर विभागाच्या रडारवर असलेली गुढीया अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. .
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील बड्या नामवंत बांधकाम कंपनीचा व्यवसायिकाला तब्बल चार कोटींचा गंडा घातला आहे. हा सर्व प्रकार 25 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान घडला होता. पुणे पोलीस या महिलेला तेव्हापासून वर्षभर शोधत होते. तिला अखेर पकडण्यात यश आलं आहे.
फसवणुकीच्या गुन्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच रिलस्टार गुढीया उर्फ सानिया सिद्धकीला फरीदाबाद येथून ताब्यात घेतले, मात्र पुण्याला तिला आणत असताना कोटा रेल्वे स्टेशनवर ती पळून गेली. पुणे पोलीस पुन्हा तिच्या मागावर होते. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर एक पोलीस पथक दिल्ली पोलिसांच्या मदतीने दिल्लीच्या जामिया नगर भागात माहिती काढून बिहारमधील सिवान येथे जाऊन सानिया ही गोपालगंज भागात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पुण्यातील हे पथक गोपालगंज येथे पोहोचले.
सानिया राहत असलेले ठिकाण पोलिसांनी शोधून काढले. ज्यावेळी पोलीस तिथे पोहोचले. त्यावेळी ती घरात नव्हती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने वेशांतर करून एका शेतात मुक्काम केला.ती घरी आली तेव्हा पोलिसांनी तिच्यावर छापा टाकला. तेव्हा देखील ती पळून जाण्याची तयारीत होती. मात्र अखेर पुणे पोलिसांनी तिला पकडले. सोशल मीडियावर रिल बनवणारी ही सानिया सायबर चोर आहे. बिहारच्या राहणारी सानियाने अनेक लोकांना सायबर चोरीचा सापळा रचून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.