पुणे: पुण्यात नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्यानं झाल्याचं बोललं जातं आहे. वैद्यकीय विभागाकडून याची शहानिशा करणं सुरु आहे. खेड राजगुरूनगरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारच्या सकाळी शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरु झाला. तेव्हा नववीत शिकणाऱ्या स्नेहा होलेला अस्वस्थ वाटू लागलं, मग अचानक तिला चक्कर आली. शिक्षकांनी तातडीनं तिला रुग्णालयात हलवलं मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
केवळ चक्कर आल्यानं स्नेहाचा मृत्यू कसा काय होऊ शकतो? नक्कीच तिला वेगळा काहीतरी आजार असू शकतो? पण तो नेमका कोणता? खरंच तिला हृदयविकाराचा झटका आला का? स्नेहाच्या पालकांना याबाबत काही कल्पना होती का? इतक्या लहान वयात खरंच हृदयविकाराचा झटका येतो का? येत असेल तर त्याची नेमकी कारणं काय आहेत? ती कारणं नेमकी कशी ओळखायची? त्यातून या लहानग्यांचा जीव कसा वाचवायचा? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालेत, जे पालकांची चिंता वाढवणारे आहेत. स्नेहाचा मृत्यू नेमका कशाने झाला आहे? याबाबतची शहानिशा खेड तालुका वैद्यकीय विभागाकडून केली जात आहे, अशी माहिती वैद्यकीय प्रमुख विलास मानेंनी दिली आहे.
वैद्यकीय तज्ञ सुचित्रा खेडकर यांनी लक्ष वेधलं
तर हृदयविकाराचे लहानग्यांमध्ये प्रमाण वाढत आहे. याकडे वैद्यकीय तज्ञ सुचित्रा खेडकर यांनी लक्ष वेधलं आहे. त्याचबरोबर पालकांना मोलाचे सल्ले ही दिलेत. अलीकडच्या काळात लहानग्यांमध्ये जन्मताच हृदयाचे विकार आढळून येत आहेत. ते लक्षात आले नाही, किंबहुना त्याकडे दुर्लक्ष करून वेळेत उपचार घेतले नाहीत. तर ही बाब पाल्याच्या जीवावर बेतणारी ठरू शकते. तसेच हल्लीची पिढी ही मोबाईलमध्ये गुरफटलेली आहे, परिणामी मैदानी खेळ आणि व्यायामापासून ती दूर असते. आहार पद्धत ही सुद्धा चिंतेची बाब आहे, पारंपरिक आहाराऐवजी अलीकडे जंक फुडला प्राधान्य दिलं जात असल्याचं ही निदर्शनास आलेलं आहे. यामुळं मुलांमध्ये स्थूलपणा वाढत चालला आहे. परिणामी लहान वयातचं हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. पालकांनी ही बाब लक्षात घेऊन खबरदारी घेणं गरजेचं आहे. योग्यवेळी योग्य ते उपचार घ्यायला हवेत. शाळा आणि घरी मुलांनी मैदानी खेळासह व्यायामाला प्राधान्य द्यायला हवं. जंक फूड टाळून हेल्दी फुडवर भर देणं गरजेचं आहे. तेव्हा हृदयविकारासह इतर आजार नियंत्रणात राहू शकतात, असा सल्ला सुचित्रा खेडकर यांनी दिला आहे.
स्नेहाच्या हृदयाला आधीपासूनच होल होतं
स्नेहाच्या हृदयाला आधीपासूनच होल होतं, अशी माहिती वडील एकनाथ होले यांनी दिली आहे.