पुणे : पुण्यात वाघोली परिसरामध्ये बीएमडब्ल्यू कारने जात असताना,एका तरुणाने येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवली, त्यानंतर रस्त्याच्या कडेला लघुशंका केल्याचा व्हिडीओ शनिवारी (दि. 8) व्हायरल झाला होता. त्यानंतर शहरात संतप्त पडसाद उमटले आहेत. याची गंभीर दखल घेत येरवडा पोलिसांनी गौरव आहुजा याला रविवारी (दि. 9) सकाळी अटक केली. याप्रकरणी गौरव मनोज आहुजा (25, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) व त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (25, रा. मार्केट यार्ड)  यांच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ओसवाल याला शनिवारी रात्री अटक केली. दरम्यान गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान गौरव मनोज आहुजा याने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माफी मागत मी आठ तासात पोलिसांसमोर हजर होईन असं म्हटलं होतं. याच व्हिडिओमध्ये त्याने पुणे पोलिसांसह 'शिंदे साहेबांची' देखील माफी मागतो असं म्हटलं होतं, त्यामुळे आता हे शिंदे साहेब नेमके कोण असा प्रश्न आता सर्वांनी उपस्थित केला जात आहे.

'शिंदे साहेब' नेमके कोण?

अश्लील कृत्य करणारा आरोपी गौरव आहुजा याने माझ्याकडून चूक झाली, मी पुणेकरांची, महाराष्ट्रातील नागरिकांची, तसेच देशाची माफी मागतो, असे म्हणत पुणे पोलिसांसह 'शिंदे साहेबांची' देखील माफी मागतो, असं म्हटलं होतं. यामुळे गौरव म्हणत असलेले 'शिंदे साहेब' नेमके कोण, याबाबत चर्चा सुरू झाली. गौरवला मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असल्याचे माहीत नसून, त्याला एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असल्याचे वाटल्याने त्याने शिंदे साहेब असे नाव घेतल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात मधोमध लक्झरी कार थांबवून गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश मद्यप्राशन करत होते. गौरवने कारमधून खाली उतरून रस्त्याच्या कडेला उतरून लघुशंका केली. दोघांनी चौकात हुल्लडबाजी देखील केली. त्यांच्या अश्लील वर्तनामुळे नागरिकांनी दोघांना जाब विचारायला सुरुवात केल्यानंतर दोघेही नगर रस्त्यावरून विमान नगरकडे पसार झाले. पोलिसांनी याची दखल घेऊन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यानंतर त्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं.

गौरव आहुजाने शनिवारी रात्री माफीचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याने व्हिडीओत शहरवासीयांची, राज्यासह देशवासीयांची माफी मागितली आहे. 'मी चुकलो, मला एक संधी द्या,' अशी विनवणी त्याने व्हिडीओद्वारे केली. 'येत्या आठ तासांत मी येरवडा पोलिस ठाण्यात हजर होईन,' असे तो म्हणाला होता. त्यानंतर गौरव रात्री कराड पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर तो रविवारी मध्यरात्री येरवडा पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याची वैद्यकीय तपासणी करून रविवारी सकाळी आठच्या सुमारास गौरवला अटक करण्यात आली, अशी माहिती परिमंडळ 4चे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली आहे.

अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गौरव कोल्हापूरला गेला 

आरोपी गौरव आहुजाचा अश्लील वर्त करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो पुण्यातून पसार झाल्यानंतर कोल्हापूरकडे गेला. त्याने त्याची लक्झरी बीएमडब्ल्यू कार कोल्हापूर शहराच्या 20 किमी अलीकडे लावली. तेथे त्याने एका रिक्षा चालकाकडे कार भाड्याने मिळेल का ? अशी विचारणा केली. रिक्षाचालकाने कारची व्यवस्था केली त्यानंतर त्याने पुन्हा पुण्याकडे येण्यासाठी सांगितलं, त्यानंतर त्याच कारच्या ड्रायव्हरला तो व्हिडिओ शूट करायला सांगितला आणि तो व्हायरल केला होता.