Pune Crime : पुण्यातील (Pune) परदेशी नागरिक नोंदणी विभागाच्या (Foreigners Registration Office) अधिकाऱ्यांनी खासगी मसाज सेंटरवर (Massage Centre) छापा टाकला. कोंढवा (Kondhwa) परिसरातील या खासगी स्पामध्ये परदेशी महिला वैध व्हिसाशिवाय (Visa) काम करताना आढळल्या. या महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याचं सांगितलं जात आहे. तत्पूर्वी व्हिसा कागदपत्रांची पूर्तता न केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
वैध व्हिसाशिवाय काम, चार परदेशी महिलांवर गुन्हा
फॉरेनर्स रजिस्ट्रेशन ऑफिसच्या (FRO)अधिकार्यांनी शुक्रवारी 24 मार्च रोजी शहरातील कोंढवा भागातील एका खाजगी स्पावर छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान अवैधरित्या परदेशी महिलांना नोकरीवर ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. परदेशी नागरिक नोंदणी विभागाच्या नियमावलीनुसार परदेशी व्यक्तीने नोकरी करण्यासाठी व्हिसा संदर्भातील आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचं आहे. परंतु, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर मायदेशी पाठवणार
या महिला बिझनेस व्हिसावर भारतात आल्या होत्या. पण त्या योग्य रोजगार व्हिसाशिवाय स्पामध्ये काम करत होत्या. या महिला थायलंड देशातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना सध्या मुंढवा इथल्या शासकीय महिला सुधारगृह इथे ठेवण्यात आलं आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या चार महिलांना लवकरच त्यांच्या मायदेशी पाठविण्यात येणार असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितलं.
मसाज सेंटरच्या मालक, मॅनेजरविरोधात गुन्हा
दरम्यान या कारवाईत मसाज सेंटरचा मालक, व्यवस्थापकासह जागा मालकाविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या महिलांकडे रोजगार व्हिसा नसतानाही त्यांना कामावर ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. कोंढवा पोलीस पुढील तपास करत आहेत.
कोरेगाव पार्कमध्ये मसाज सेंटरमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
दरम्यान आठवड्याभरापूर्वी पुण्यातील कोरेगाव पार्क इथल्या स्पा सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला होता. मसाज सेंटरच्या नावाखाली मुलींना वेश्याव्यवसायात अडकवणाऱ्या मसाज सेंटरच्या संचालकाला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरुन सात मुलींना ताब्यात घेतले. ज्यामध्ये अनेक मुली इतर राज्यातील सांगितल्या जात आहेत.
पुण्यात गुन्हेगारीत वाढ
पुण्यात सातत्याने गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. रोज पुण्यात नवे गुन्हे समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचार, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहे. शिवाय कोयता गँग, चुहा गँगचीही दहशत पाहायला मिळते.