Pune Crime News : पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली असून बीडमधील विवाहित (Black magic) महिलेचं मासिक पाळीतील रक्त सासरच्या मंडळींनी विकल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. 27 वर्षीय पीडित महिलेने या प्रकरणी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना बीडमध्ये म्हणजे या महिलेच्या सासरी घडली असून माहेरी म्हणजे पुण्याला आल्यानंतर तिने ही तक्रार केली आहे.
या प्रकरणी पती, सासू, सासरे, दीर, मावस दीर आणि आणखी एका व्यक्तीवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार 2019 पासून सुरु होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय पीडित महिला ही पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहायला आहे. 2 वर्षांपूर्वी पीडित महिला आणि तिच्या पतीच्या प्रेम विवाह झाला होता. यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक छळ करायला सुरुवात केली. अघोरी विद्येच्या नादात सासरच्या मंडळींनी पीडित महिलेच्या मासिक पाळी दरम्यान तिचे हातपाय बांधून तिचे मासिक पाळीचे रक्त कापसाने काढत ते भरुन 50 हजार रुपयांना जादूटोण्यासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. घडलेली घटना या पीडित महिलेने तिच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.
पुण्यात केलेली ही तक्रार आता बीड पोलिसांकडे ट्रान्सफर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्य महिला आयोगाकडून दखल
याप्रकरणी तिचा पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, म्हाधू कथले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता महिला आयोगाकडून देखील चौकशीचे आदेश देण्यात असल्याची माहिती, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. पुण्यातील घटना अतिशय घृणास्पद असून विकृत मानसिकता असणाऱ्या या आरोपींवर तात्काळ कारवाई व्हायला हवी. राज्य महिला आयोगात यात संबंधितांना निर्देश देईलच पण पुण्यासारख्या शहरात अजूनही अंधश्रद्धेला बळी पडणारी कुटुंब आहेत हे दुर्दैवी आहे, अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे. यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असंही त्या म्हणाल.
जादूटोण्याबाबत तक्रार करण्याचं आवाहन
परिसरात नरबळी, अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणाच्या घटना घडल्यास किंवा निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जादूटोण्याच्या दोन घटना समोर आल्या होत्या. त्या घटनेमुळे पुण्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.