पुणे: मागील काही दिवसापासून अगदी क्षुल्लक कारणांवरून वाद, खून मारामारी होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत.अशातच पुण्यात रेनकोटवरून झालेल्या वादातून (Pune Crime) डिलिव्हरी बॉयने मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन डिलिव्हरी बॉयमध्ये झालेला वादाचे रूपांतर खूनामध्ये झालं आहे. रेनकोटवरून झालेल्या वादात मित्राने पोटात चाकू खुपसून (Pune Crime) खून केला. पुण्यातील सिंहगड रोड भागातील नऱ्हे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. 


आदित्य वाघमारे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुरेश भिलारे या तरुणाला खून प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि सुरेश हे दोघे मित्र असून सकाळी एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये काम करतात आणि संध्याकाळी एका शॉपिंग वेबसाईटसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. दोघं मूळचे बीड जिल्ह्याचे असून गेल्या एक महिन्यापासून एकमेकांच्या ओळखत होते.


काल दुपारी त्या दोघांमध्ये रेनकोट वरून वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी त्या दोघांनी रात्री नऱ्हे भागात भेटण्यासाठी ठरवलं. रात्री 10.30 वाजता ते दोघे भेटले मात्र वाद मिटण्याच्या ऐवजी त्यांच्यात अजून वादावादी झाली. दरम्यान, भिलारेने त्याच्याकडील चाकू (Pune Crime) वाघमारेच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात वाघमारे जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.


नेमकं काय घडलं?


मृत आदित्यने दुपारी घरी येऊन फिर्यादीला सांगितले की, मला डॉमिनोजमधील मॅडमने रेनकोट दिला होता. तो सुरेशने मला काढायला भाग पाडलं. यानंतर आमच्यामध्ये वाद झाले त्यावेळी सुरेश माझ्या बोटाला चावला. आपण त्याला भेटून झालेला वाद मिटवू असं देखील त्याने सांगितलं. त्याप्रमाणे फिर्यादीने सुरेशला रात्री फोन केला. मात्र सुरेशने फोनवर बोलण्यास नकार देत नऱ्हे येथील हॉटेल मराठा येथे भेटायला ये म्हणाला. यामुळे फिर्याद प्रवीण मोरे, आदित्य, रतन शिंगाडे, सचिन तांगडे असे सर्वजण आदित्यचे रूममेट त्यांच्या कारमधून सुरेशला भेटायला गेले. 


भेटायला गेल्यानंतर सुरेशने आदित्यला उद्देशून शिवी दिली त्यानंतर चिडून आदित्यने सुरेशच्या चापट मारली. यामुळे सुरेशने त्याच्या पँटच्या खिशातील लपवलेला चाकू काढून आदित्यच्या डाव्या काखेजवळ मारला (Pune Crime). यामुळे आदित्य घाबरून झिल कॉलेजच्या दिशेने पळू लागला. त्याच्या मागे सुरेशही पळत गेला. थोड्याच अंतरावर आदित्यला पकडून छोतीत चाकू खुपसला. यामुळे आदित्य खाली रस्त्यावर कोसळला. कारमधून फिर्यादीसह तिघेजण घटनास्थळी पोहचले. तेव्हा आरोपीने चाकू दाखवत त्यांना बाजूला केलं. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांनाही त्याने चाकू दाखवत धमकावल्याचं (Pune Crime) फिर्यादीने सांगितलं. यानंतर सुरेश तेथून पळून गेला. आदित्यला रूग्णालयत उपचारांसाठी दाखल केलं मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे