पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहेत. शहरात गाड्याची तोडफोड, कोयते घेऊन दहशत पसवणं, आणि आता गोळीबार, पुण्याजवळील कोल्हेवाडीत हवेत गोळीबार करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. गाडीला कट मारून घासल्याच्या रागातून वाद झाला आणि याच वादातून एकाने देशी बनावटीचे पिस्तूल काढत हवेत थेट गोळीबार केला. खडकवासला परिसरातील कोल्हेवाडी या ठिकाणी काल (सोमवारी, ता-4) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास गाडी घासली गेली, या रागातून शिवीगाळ करण्यात आली आणि त्यानंतर थेट हवेत गोळीबार करण्यात आला. अभिजीत चव्हाण असं गोळीबार करणाऱ्या आरोपी नाव आहे.

Continues below advertisement


गाडी घासल्याचा अन् कट मारल्याचा राग...


गाडी घासल्यानंतर अभिजीत चव्हाण समोरच्या व्यक्तीला मारण्यासाठी त्याच्या मित्रांना आणि भावाला बोलवलं. त्यानंतर थेट त्याच्या एका बंदुकीतून हवेत गोळीबार करून समोरच्या माणसाला धमकवण्याचा प्रयत्न केला असा हा धक्कादायक प्रकार पुण्यातील खडकवासला परिसरामध्ये समोर आला आहे. त्यानंतर नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अभिजीत चव्हाण याला ताब्यात घेतलं. आज सकाळी इतर सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. अभिजीत चव्हाणकडे ही पिस्तूल नक्की कुठून आली याचं देखील आता पोलीस शोध घेत आहेत. यासाठीही आरोपींना दुपारच्या सुमारास कोर्टात हजर केलं जाणार आहे. पुणे शहरात अशा गोळीबाराच्या घटनेत सातत्याने वाढ होताना दिसते, काल 24 तासात पुणे शहरात दोन गोळीबाराच्या अशा घटना घडल्या आहेत.


घटनेनंतर सुप्रिया सुळेंची संतापजनक पोस्ट


शहरात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या या घटनांवरती आणि काल (सोमवारी, ता4)  घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे, त्यांनी याबाबत सोशल मिडीया पोस्ट शेअर केली आहे, पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, "खडकवासला येथील कोल्हेवाडी चौकात काल रात्री गाडी घासण्याच्या कारणावरुन झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान गोळीबारात झाले. टोळक्यातील एकाने गावठी पिस्तुलातून तीन राऊंड फायर केले. हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसस्टॉप आहेत. सुदैवाने या गोळीबारात कुणाला मोठी इजा झाली नाही. पुण्यासारख्या शांत शहराला नेमकं झालंय तरी काय? येथील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. ही अतिशय संतापजनक आणि तितकीच चिंताजनक बाब आहे. सर्वसामान्य जनता आज भीतीच्या छायेखाली जगत असून गुन्हेगारांना मात्र मोकळे रान मिळाले आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याचे काम गृहखात्याने थांबविले आहे का असा संशय यावा इतपत ही गंभीर परिस्थिती आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी तातडीने ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे", अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे.