पुणे : अवघ्या सहा वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर निर्घृण खून करणाऱ्या नराधमाला फाशी शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणात आरोपीच्या आईला सुद्धा सात वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील (Pune Crime) शिवाजीनगर सत्र न्यायालयमध्ये झाली. यावेळी न्यायालयाने आरोपीला फाशी शिक्षा सुनावली, तर आईला सात वर्षांची शिक्षा सुनावली. ही घटना मावळ तालुक्यामध्ये घडली होती. 


चिमुरडीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार


मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावामध्ये सात वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर नराधमाने खून केला होता. ही घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. तेजस उर्फ दादा महिपती दळवी असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. या घटनेनंतर कामशेत पोलिसांनी तपासाचे सूत्रे फिरवत अवघ्या 24 तासांमध्ये आरोपी तेजस दळवीला अटक केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपी तेजस दळवीच्या आईचा सुद्धा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे समोर आले होते. मुलांनी केलेल्या कृत्यानंतर गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी आईनेच मदत केल्याचे तपासामध्ये समोर आले होते. त्यामुळे तिला सुद्धा सात वर्षांच्या कारावासात शिक्षा सुनावण्यात आली. 


घरासमोरून चिमुरडी बेपत्ता 


अपहरण झालं त्या दिवशी नागपंचमी असल्याने शाळेला सुट्टी होती. त्यामुळे चिमुकली घरासमोर खेळत असतानाच बेपत्ता झाल्याने शोध सुरु करण्यात आला. दुसऱ्या दिवशी गावातील शाळेच्या मागे झुडुपात मृतदेह आढळला. लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला होता. विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी एकूण 29 साक्षीदार तपासले. चिमुकलीला आरोपीसोबत पाहणारी गावातील महिला, शवविच्छेदन आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर आणि आरोपीच्या घर झडतीवेळी उपस्थित सरकारी पंच यांची साक्ष महत्त्वाची ठरली. 


केअर टेकरला 10 वर्षे सक्तमजुरी


दरम्यान, स्वयंसेवी संस्थेत 20 वर्षीय विशेष मुलीवर 60 वर्षीय ‘केअर टेकर’ने बलात्कार केल्याने निष्पन्न झाल्याने डीएनए रिपोर्टमुळे केअर टेकरला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकारानंतर पीडितेचे लग्न झाल्याने न्यायालयात तिची साक्ष झाली नव्हती. मात्र, तिने बाळाला जन्म दिला. तथापि, डीएनए रिपोर्टवरून हे बाळ आरोपीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हा पुरावा शिक्षेसाठी महत्त्वाचा ठरला. पुराव्यानुसार केअर टेकरला 10 वर्षे सक्तमजुरीआणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी सुनावली. 


इतर महत्वाच्या बातम्या