पुणे : स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये काही महिन्यांपूर्वी 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडे (Pune Swargate Dattatray Gade) दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याने महिलेवर लैंगिक अत्याचारासारखा गंभीर गुन्हा केला आहे. त्याला जामीन दिल्यास तो गुन्हा करू शकतो, असा युक्तिवाद सरकार पक्षाकडून करण्यात आला आहे. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी हा याबाबतचा निकाल दिला आहे.(Pune Swargate Dattatray Gade)
नेमकं प्रकरण काय?
स्वारगेट स्थानकातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रेय गाडे याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना 25 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी गाडेविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरोधात 893 पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गाडेने अॅड. वाजेद खान बीडकर यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी केलेला पहिला अर्ज सत्र न्यायालयाकडून 30 जून रोजी फेटाळण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत गाडेने पुन्हा एकदा आपल्या वकिलांमार्फत दुसरा जामीन अर्ज न्यायालयात सादर केला. हा बलात्कार नसून, परस्पर सहमतीने संबंध आहेत. आरोपीची पत्नी व दोन मुले त्याच्यावर अवलंबून आहेत. या प्रकरणी तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र दाखल झाले असल्याने परिस्थितीत बदल झाला आहे. या आधारावर आरोपीला जामीन द्यावा, असा युक्तीवाद अॅड. वाजेद खान बिडकर यांनी केला होता. त्याला विशेष सरकारी वकील अजय मिसार आणि प्रकरणातील पिडीत तरुणीच्या वकील श्रिया आवले यांनी विरोध दर्शविला. त्यानंतरच्या युक्तीवदावर गाडेचा जामीन फेटाळण्यात आला आहे.